भारत-ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्याला नवी दिशा; क्षमता विकास, संशोधन आणि महिला सक्षमीकरणावर भर
नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील सहकार्याला अधिक व्यापक आणि परिणामकारक स्वरूप देण्यासाठी दोन्ही देशांनी २०२३ मधील सामंजस्य कराराच्या आधारे नवीन क्रीडा सहकार्य आराखडा तयार केला आहे. हा आराखडा द्विपक्षी
New Direction for India-Australia Sports Cooperation


New Direction for India-Australia Sports Cooperation


नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील सहकार्याला अधिक व्यापक आणि परिणामकारक स्वरूप देण्यासाठी दोन्ही देशांनी २०२३ मधील सामंजस्य कराराच्या आधारे नवीन क्रीडा सहकार्य आराखडा तयार केला आहे. हा आराखडा द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातील दीर्घकालीन भागीदारी, कौशल्यविकास, संशोधन, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्याला नवी चालना देणार आहे. अहमदाबाद येथे प्रस्तावित २०३० राष्ट्रकुल स्पर्धा तसेच ब्रिस्बेन येथे होणाऱ्या २०३२ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारताची जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन या आराखड्यात भविष्योन्मुख उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.

या आराखड्यानुसार भारतातील प्राधान्याच्या क्रीडा प्रकारांसाठी उच्च कार्यक्षमता क्रीडा केंद्रांच्या उभारणीसाठी आणि त्यांच्या प्रभावी संचालनासाठी दोन्ही देश सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणार आहेत. पॅरा क्रीडा क्षेत्रालाही विशेष महत्त्व देण्यात आले असून पॅरा वर्गीकरण, प्रशिक्षण आणि कामगिरी सुधारणा यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अनुभवाचा लाभ भारताला मिळणार आहे. याशिवाय भारतीय आणि ऑस्ट्रेलियन विद्यापीठांमध्ये शैक्षणिक आणि संशोधनात्मक सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

प्रशिक्षकांच्या विकासावरही या आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे. भारतीय प्रशिक्षकांना ऑस्ट्रेलियामध्ये आणि ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांना भारतामध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शारीरिक शिक्षण, शालेय क्रीडा, क्रीडा विज्ञान आणि समुदाय सहभाग या क्षेत्रांतील अनुभवांची देवाणघेवाण केली जाणार असून योगाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यदायी फायद्यांचा प्रसार करण्यासाठी योगासन क्रीडा क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य वाढविणार आहेत. तसेच प्रतिभावान भारतीय युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलियातील उच्च दर्जाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी शिष्यवृत्ती आणि इतर संधी उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देत खेळाडूंची कामगिरी, दुखापत प्रतिबंध, क्रीडा पोषण, परिधान करण्यायोग्य तंत्रज्ञान, पुनर्वसन तंत्र आणि पॅरा क्रीडा यांसारख्या विषयांवर संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत. तसेच डोपिंगविरोधी उपाययोजनांमध्येही दोन्ही देश परस्पर सहकार्य वाढवून जागतिक स्तरावरील क्षमता विकास कार्यक्रमांना पाठबळ देणार आहेत.

प्रमुख क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक नियोजन, सुविधा आणि व्यवस्थापनाचा अनुभव एकमेकांशी सामायिक केला जाणार असून परस्पर हिताच्या खेळांना चालना देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये प्रदर्शनीय सामने आणि युवा स्पर्धा आयोजित करण्यावर भर दिला जाणार आहे. ऑस्ट्रेलियात कबड्डी आणि खो-खो तर भारतात ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग आणि बास्केटबॉलला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय डिसेंबर २०२६ मध्ये चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या बिग बॅश लीग सामन्याचे स्वागत करत भारतात वार्षिक बीबीएल सामने आयोजित करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

क्रीडा उद्योग आणि गुंतवणुकीलाही या आराखड्यात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. क्रीडा साहित्य उत्पादन, प्रसारण, इव्हेंट मॅनेजमेंट आणि क्रीडा स्टार्टअप्समध्ये दोन्ही देशांतील कंपन्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी डिसेंबर २०२६ मध्ये मुंबईत क्रीडा उद्योग शिखर परिषद आयोजित करण्याची योजना आहे. तसेच महिलांच्या नेतृत्व, आरोग्य, सामाजिक समावेशन आणि उच्च कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त उपक्रम आणि द्विपक्षीय स्पर्धा आयोजित करून क्रीडा क्षेत्रातील महिला सहभाग अधिक बळकट करण्याचा निर्धार या आराखड्यात व्यक्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande