
राज्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश
नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.) : केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन आणि केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांना राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगान ‘जन गण मन’ यांच्या सादरीकरणासंदर्भातील विद्यमान नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
गृह मंत्रालयाने 9 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या पत्राद्वारे सर्व राज्यांचे मुख्य सचिव, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक तसेच केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये व विभागांच्या सचिवांना यासंदर्भातील सूचना पाठवल्या आहेत. या पत्रासोबत राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाच्या सादरीकरणाबाबत पूर्वी जारी करण्यात आलेले सर्व आदेशही जोडण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, कोणत्या प्रसंगी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान गायले किंवा वाजवले जाणे आवश्यक आहे, तसेच कोणत्या प्रसंगी त्यांचे सादरीकरण करता येईल, याबाबतच्या सर्व मार्गदर्शक सूचना संबंधित आदेशांमध्ये नमूद आहेत. मंत्रालयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे की, एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान दोन्ही सादर करण्यात येत असल्यास सर्वप्रथम ‘वंदे मातरम्’ (राष्ट्रगीत) आणि त्यानंतर ‘जन गण मन’ (राष्ट्रगान) सादर करण्यात यावे.
ज्या राज्यांमध्ये राज्यगीत सादर करण्याची परंपरा आहे, तेथे राज्यगीतासह राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानही सादर करता येईल. अशा वेळीही राष्ट्रगीतानंतर राष्ट्रगान सादर करण्याचा क्रम कायम ठेवावा, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान सादर करताना त्यांचे अधिकृत शब्द, शुद्ध मजकूर, योग्य भाषा आणि अचूक उच्चार यांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे पालन सुलभ व्हावे यासाठी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचा अधिकृत मजकूर तसेच योग्य उच्चार गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही पत्रात देण्यात आली आहे. राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासन आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांनी आपल्या अखत्यारीतील सर्व संस्था व संघटनांना आवश्यक सूचना देऊन या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
या पत्राच्या प्रती राष्ट्रपती सचिवालय, उपराष्ट्रपती सचिवालय, पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, भारत निवडणूक आयोग, संसद सचिवालय, सर्वोच्च न्यायालय, विविध उच्च न्यायालये, नीती आयोग तसेच इतर घटनात्मक आणि शासकीय संस्थांनाही पाठविण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानासंदर्भातील मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारकडून वेळोवेळी जारी केल्या जात असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी