

एचएएलचे महाव्यवस्थापक संजय चौधरी यांचे उद्योजकांना आवाहन
नाशिक, 10 जुलै (हिं.स.) : स्थानिक एमएसएमई आणि उद्योजकांना एचएएलच्या विमाननिर्मिती प्रकल्पांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील सुटे भाग उत्पादक व पुरवठादारांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होईल. त्यातून ‘ *आत्मनिर्भर भारत’ अभियानाला* बळ मिळेल तसेच नाशिकच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), नाशिक विभागाचे महाव्यवस्थापक संजय चौधरी यांनी केले.
नासिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि एचएएल, नाशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी आयोजित दोन दिवसीय *एचएएल – व्हेंडर डेव्हलपमेंट मीट २०२६* चे आयोजन निमा हाऊस येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनिष रावल व किशोर राठी, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव किरण पाटील, एचएएलचे महाव्यवस्थापक संशोधन सौम्य बेहेरा, निर्मिती महाव्यवस्थापक नसीरुल्ला एस. के., प्रकल्पप्रमुख (AMD) संजीव कुमार, निमाच्या एमएसएमई समितीच्या अध्यक्षा दीपाली चांडक तसेच ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत उपस्थित होते.
संरक्षण उत्पादनातील स्वदेशीकरणाला गती देणे आणि स्थानिक पुरवठा साखळी अधिक सक्षम करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादक, लघुउद्योग आणि स्टार्टअप्सना एचएएलच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून व्यावसायिक संधी, तांत्रिक अपेक्षा आणि निविदांविषयी माहिती मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे.
नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान स्थानिक उद्योगांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला.
तेजससह विविध लढाऊ विमानांच्या निर्मितीत एचएएल आणि विशेषतः नाशिक विभागाने घेतलेल्या उल्लेखनीय झेपेची माहिती त्यांनी यावेळी दिली. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत एचएएलसोबत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील एकूण ४११ व्हेंडर्स सहभागी झाले आहेत. त्यापैकी नाशिकमधील १२६ व्हेंडर्सनी नोंदणी केली असली तरी केवळ २६ व्हेंडर्सनी प्रत्यक्ष पुरवठा करत आहेत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
नाशिकमधील अधिकाधिक उद्योगांनी एचएएलसोबत भागीदारी करून ‘विकसित नाशिक’ या संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केले.
या उपक्रमात स्थानिक उद्योगांचा सहभाग वाढावा यासाठी निमा सातत्याने प्रयत्नशील असल्याबद्दल चौधरी यांनी निमाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि भविष्यातही हे सहकार्य अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. भविष्यात २०० आसनी प्रवासी विमानाची निर्मिती करण्याचा एचएएलचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
प्रास्ताविकात निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले की, एचएएलच्या विमाननिर्मिती प्रकल्पात सहभागी होण्यासाठी नाशिकमधील उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, केवळ एका दिवसात ३०० उद्योजकांनी नोंदणी केली आहे. निमा आणि एचएएल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या दोन दिवसीय व्हेंडर डेव्हलपमेंट मीटमुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या दोन वर्षांत नाशिकमध्ये सुमारे ₹३५,००० कोटींची औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यात यश आले असून, आता एचएएलच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे भविष्यात नाशिकमधील एकूण औद्योगिक गुंतवणूक नव्या उंचीवर पोहोचण्याची क्षमता निर्माण झाली आहे, असे नहार यांनी नमूद केले.
निमाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणाला गती मिळाली असून, विस्तारानंतर विमानतळाची क्षमता पूर्वीच्या तुलनेत सुमारे तिप्पट वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निमाच्या एमएसएमई समितीच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले.
यावेळी एच ए एल तर्फे आउटसोर्सिंग, इंडिजिनीजेशन, पुरवठा साखळी, जेम पोर्टल व ट्रेड्सची सविस्तर चित्रफितीत माहिती देण्यात आली व उत्पादित करावयाच्या सुट्ट्या भागाचे यावेळी प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्यास आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, निमाचे माजी अध्यक्ष देवेंद्र बापट, संजय सोनवणे, जावेद अली, सचिन कंकरेज, सुधीर बडगुजर, किरण खाबिया, वैभव नागसेठिया, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, किरण पाटील, कैलास आहेर, भावेश भन्साळी, अनिल मंत्री, रवींद्र पाटकर, जयश्री कुलकर्णी, रितेश सिंह, विक्रम दुकले, विलास जोंडाळकर, संदीप गुंजाळ यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उद्योजक आणि एचएएलचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV