करूर चेंगराचेंगरी : मुख्यमंत्री विजय यांनी 32 कुटुंबीयांना सोपवले सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र
चेन्नई, 10 जुलै (हिं.स.)। तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) चे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी शुक्रवारी करूर येथे मागील वर्षी निवडणूक प्रचारसभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 32 जणांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका
TN KARUR STAMPEDE CM APPOINTMENT LETTERS


चेन्नई, 10 जुलै (हिं.स.)। तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळगम (टीव्हीके) चे अध्यक्ष जोसेफ विजय यांनी शुक्रवारी करूर येथे मागील वर्षी निवडणूक प्रचारसभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 32 जणांच्या कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. करूरच्या एटलस मैदानावर आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते, मृतांच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

जोसेफ विजय तिरुचिरापल्ली विमानतळावरून रस्तामार्गे करूर येथे पोहोचले. मार्गातील विविध ठिकाणी पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. नियुक्तीपत्रांचे वाटप केल्यानंतर त्यांनी करूर चेंगराचेंगरीला आपल्या सार्वजनिक जीवनातील सर्वात दुःखद घटनांपैकी एक असल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

आपल्या भाषणात विजय म्हणाले की, करूरची घटना त्यांच्या आयुष्यातील सर्वात खोल जखम आहे आणि ती कधीही विसरता येणार नाही. त्यांनी सांगितले की, काही लोकांनी त्यांच्यावर घटनेच्या वेळी तेथून निघून गेल्याचा आरोप केला, मात्र त्यांच्या दृष्टीने जनतेची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता होती.

विजय म्हणाले, माणूस कितीही उंचीवर पोहोचला तरी काही वेदना आणि काही जखमा कधीही विसरता येत नाहीत. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना आणि सर्वात खोल जखम म्हणजे करूरची घटना आहे. ते म्हणाले, काही लोक म्हणतात की त्या कठीण काळात मी तेथून निघून गेलो होतो. जर मला विचारले गेले की पैसा महत्त्वाचा आहे की जनता, तर माझे उत्तर नेहमीच जनता हेच असेल.

मुख्यमंत्र्यांनी करूर पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, नामक्कलहून करूरला पोहोचण्याच्या वेळी पोलिसांनी त्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यांचे म्हणणे होते की, प्रशासनाने वेळीच आवश्यक माहिती दिली असती तर कार्यक्रम स्थगित किंवा रद्द करता आला असता आणि दुर्घटना टाळता आली असती. त्यांनी सांगितले की, पेरंबलूरहून अरियालूरकडे जाताना पोलिसांनी आधीच सतर्क केले होते, त्यामुळे त्यांनी कार्यक्रम स्थगित केला होता, मात्र करूरच्या बाबतीत असे झाले नाही.

त्यांनी करूर चेंगराचेंगरीच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत सांगितले की, संपूर्ण घटनाक्रमाचे सत्य समोर आले पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल.

दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी देण्यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठात दाखल याचिकेवरही शुक्रवारी सुनावणी झाली. न्यायालयाने संबंधित पक्षांना तात्पुरती सरकारी नियुक्ती देण्याचे निर्देश दिले.

उल्लेखनीय आहे की, टीव्हीकेच्या वतीने 27 सप्टेंबर 2025 रोजी करूर येथे आयोजित निवडणूक प्रचारसभेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन 41 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) करत आहे. त्यावेळी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना तामिळनाडू सरकारकडून प्रत्येकी 10 लाख रुपये आणि टीव्हीकेकडून प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत यापूर्वीच देण्यात आली होती. आता 32 कुटुंबांतील प्रत्येकी एका सदस्याला सरकारी नोकरीचे नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande