


नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। देशभरात सुरू असलेल्या मुसळधार मान्सून पावसामुळे अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून पूरस्थिती, भूस्खलन, घर कोसळण्याच्या घटना आणि वीज कोसळल्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केले आहे. दिल्लीत गुरुवारी मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेशात पाऊस आणि वीज कोसळल्याच्या विविध घटनांमध्ये किमान १९ जणांचा जीव गेला आहे. केरळमधील वायनाड येथे ७ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे.
उत्तराखंड हे सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले असून डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने १०७ संपर्क मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे चारधाम यात्रेवरही परिणाम झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून देहरादून, पौडी, टिहरी, चमोली, रुद्रप्रयाग, हरिद्वार, नैनीताल, उधमसिंहनगर, चंपावत आणि बागेश्वर जिल्ह्यांतील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे १०० फूट लांबीचा लोखंडी पूल पाण्याखाली गेला असून काही गावे बाहेरील संपर्कापासून तुटली आहेत. राज्यात मुसळधार पावसामुळे ७५ रस्ते बंद करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात बुलंदशहरमध्ये घराची भिंत कोसळून एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर गाझियाबादमध्ये पाण्यात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. तर पूर्वांचमधील चार जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानातील धौलपूर येथे मुसळधार पावसामुळे घर कोसळून सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले, तर अजमेर जिल्ह्यातही कच्चे घर कोसळल्याची घटना घडली. पावसामुळे राज्यातील सहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये सततच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. काही भागांत २४ ते ३० तासांत १०० ते १६० मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. सफदरजंग हवामान केंद्रातही विक्रमी पावसाची नोंद झाली असून शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गुजरातमध्येही मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून सुरतसह विविध भागांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरस्थितीमुळे सुमारे ३,९०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात मात्र पुढील तीन ते चार दिवस मान्सूनची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून केवळ पन्ना आणि सतना जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भोपालसह राज्यातील बहुतांश भागांत हलक्या सरी आणि मेघगर्जनेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule