सर्वोच्च न्यायालयात वकिलाचा गोंधळ; सरन्यायाधीशांना शिवीगाळ, फाईल भिरकावल्याची घटना
नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान एका वकिलाने केलेल्या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित वकिलाने न्यायालयीन कामकाजादरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप अस
unprecedented ruckus lawyer supreme court hurled expletives chief justice flung file


unprecedented ruckus lawyer supreme court hurled expletives chief justice flung file


नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान एका वकिलाने केलेल्या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित वकिलाने न्यायालयीन कामकाजादरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप असून त्याने न्यायालयात असलेली फाईल हवेत भिरकावली. ही घटना घडली तेव्हा सरन्यायाधीश न्यायालयात उपस्थित नव्हते. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुरू होती.

हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेशी संबंधित होते. याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने सुनावणीदरम्यान अचानक आक्रमक भूमिका घेतली. सुनावणी सुरू झाल्यानंतर वकिलाने न्यायालयाला लखनौच्या एसीपीविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी केली. यावर न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त करत, “तुम्ही आम्हाला आदेश देत आहात का?” असा सवाल केला.

यानंतर वकिलाने “माझ्या बाजूने एवढेच, सर्व काही रेकॉर्डवर आहे,” असे सांगितले आणि त्याने केसची फाईल हवेत फेकली. त्यानंतर त्याने न्यायालयात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालयात काही काळ शांतता पसरली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करत संबंधित वकिलाला न्यायालयाबाहेर नेले.

या प्रकारानंतर खंडपीठाने संयम दाखवत संबंधित वकिलाविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याचे टाळले. न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती अत्यंत अस्वस्थ दिसत असून त्याचे वर्तन निराशेतून झाले असावे. “आम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती आहे. आम्हाला त्याच्याविरुद्ध कोणतीही कारवाई करायची नाही,” असे न्यायालयाने नमूद केले. तसेच संबंधित याचिकेतील उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासाठी कोणताही ठोस आधार नसल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेनंतर संबंधित वकिलावर बार कौन्सिलकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. वकिलांनी व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करणे अपेक्षित असते. गैरवर्तनाच्या प्रकरणात वकील कायदा, 1961 अंतर्गत चौकशी केली जाऊ शकते. आरोप सिद्ध झाल्यास बार कौन्सिलची शिस्तपालन समिती ताकीद, काही काळासाठी वकिली करण्यास बंदी किंवा गंभीर प्रकरणात वकिलीचा परवाना रद्द करण्यासारखी कारवाई करू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande