
गांधीनगर, 11 जुलै (हिं.स.)। गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील मजेवडी गावाजवळ शनिवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
बनासकांठा येथील एक कुटुंब आपल्या एका नातेवाईकांच्या अस्थी विसर्जनासाठी कारने सोमनाथकडे जात होते. याच दरम्यान जुनागढ जिल्ह्यातील मजेवडी गावाजवळ फोर-लेन रस्त्यावर त्यांच्या कारची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि 108 रुग्णवाहिका पथकही घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जुनागढ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. इतर दोघांवरही उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात कारची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याचे समोर आले आहे. ट्रक महामार्गावर का उभा होता? तसेच या अपघातामागे अन्य कोणते कारण जबाबदार होते का, याचाही पोलिस तपास करत आहेत.
या हृदयद्रावक अपघातामुळे बनासकांठा येथील संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule