मुंबई : पवन कल्याण यांच्या उजव्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
आगामी दोन महिन्यांनी डाव्या खांद्यावरही होणार शस्त्रक्रिया मुंबई, 11 जुलै (हिं.स.) : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या उजव्या खांद्यावर आज, शनिवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात
पवन कल्याण, उपमुख्यमंत्री आंध्रप्रदेश (संग्रहित फोटो)


आगामी दोन महिन्यांनी डाव्या खांद्यावरही होणार शस्त्रक्रिया

मुंबई, 11 जुलै (हिं.स.) : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या उजव्या खांद्यावर आज, शनिवारी सकाळी मुंबईतील एका रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या दोन्ही खांद्यांतील रोटेटर कफ गंभीररीत्या दुखावला असून स्नायूंमध्येही फाटणे (मसल टिअर) आढळले होते. तपासणीनंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता.

माहितीनुसार, पवन कल्याण गेल्या जवळपास दहा वर्षांपासून खांद्याच्या वेदनांनी त्रस्त होते. त्यांच्या खांद्याला 2016 मध्ये प्रथम गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यांनी राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रम सुरूच ठेवले. 2018 मधील संघर्ष यात्रा, 2019 च्या निवडणूक प्रचारादरम्यान तसेच त्यानंतर शेतकऱ्यांच्या भेटीच्या कार्यक्रमांत समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आणि भेटण्यासाठी पुढे येत होते. सतत होणारे हस्तांदोलन, खांद्यावरचा ताण आणि गर्दीचा दबाव यामुळे त्यांची दुखापत अधिक गंभीर होत गेली. तरीही त्यांनी वेदनांकडे दुर्लक्ष करून आपले सार्वजनिक कार्यक्रम सुरू ठेवले.

डॉक्टरांनी सांगितले की, पवन कल्याण यांच्या दोन्ही खांद्यांवर एकाच वेळी शस्त्रक्रिया केल्यास वेदना आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक कठीण झाली असती. त्यामुळे प्रथम उजव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी त्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, तर शनिवारी सुमारे साडेतीन तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. डाव्या खांद्यावरची शस्त्रक्रिया पुढील 2 महिन्यांत करण्यात येणार आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पवन कल्याण यांच्या लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना करत या कठीण काळात त्यांना बळ मिळो, अशीही ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande