
नाशिक, 11 जुलै (हिं.स.)। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवरून आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ऑडिओ क्लिपमधील संभाषणावरून सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक मते मांडली आहेत.
राज्य सरकारने 'लाडकी बहीण' योजनेतून सुमारे ८० लाख महिलांना केवायसी प्रक्रियेअभावी बाहेर ठेवल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. जर देशात आधार आणि जनधन खात्यांचे एवढे मोठे नेटवर्क असताना सरकार या महिलांचे केवायसी का करू शकले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आली की पैसे टाकायचे आणि निवडणूक संपली की काढून घ्यायचे, अशी ही फसवणूक असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच, या योजनेत अनेक पुरुष लाभार्थी कसे आले, याची एसआयटी चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
अमोल कोल्हेंच्या 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरण
खासदार अमोल कोल्हे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू, असे जे वक्तव्य केले होते, त्यावर सुप्रिया सुळे यांनी बाजू मांडली. त्या म्हणल्या की, अमोल दादांनी त्यांच्या विशिष्ट शैलीत 'विचार करू' असे म्हटले होते, याचा अर्थ 'हो' असा होत नाही. पत्रकारांनी जुने संदर्भ सोडून 'सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया' (निवडक विस्मरण) दाखवू नये, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मोशी येथील इमारत दुर्घटनेवर प्रशासनाला धारेवर धरले
मोशी येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेबाबत बोलताना सुळे यांनी प्रशासकीय बेजबाबदारपणावर बोट ठेवले. एका मजल्याची परवानगी असताना दोन ते तीन मजले कसे बांधले गेले? असा प्रश्न विचारत त्यांनी सरकारचे तंत्रज्ञान आणि गुगल मॅपिंग यंत्रणा केवळ विरोधकांच्या आंदोलनावेळीच चालते का? असा खोचक सवाल केला.
राज्यातील गुन्हेगारी आणि ड्रग्जच्या विळख्यावर चिंता
पुणे आणि एकूणच महाराष्ट्रात वाढत्या गुन्हेगारीवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असताना तेथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढणे आणि तरुणाई ड्रग्जच्या आहारी जाणे हे चिंताजनक आहे. पोलिसांचा धाक उरलेला नाही, असे सांगत त्यांनी एका नगरसेवकाने पोलिसांवर हात उचलल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV