नागपूरात 18 जुलैला ठाकरे गटाचे रामरक्षा आंदोलन
मुंबई, 11 जुलै (हिं.स.)। मुंबईतील पहिल्या टप्प्यानंतर आता शिवसेना ठाकरे पक्षाकडून नागपूरात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. येत्या 18 जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राच्या उपराजधानीत हे आंदो
Thackeray Hold Ramraksha Andolan Nagpur July 18


मुंबई, 11 जुलै (हिं.स.)। मुंबईतील पहिल्या टप्प्यानंतर आता शिवसेना ठाकरे पक्षाकडून नागपूरात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. येत्या 18 जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता महाराष्ट्राच्या उपराजधानीत हे आंदोलन होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच मुंबई आणि विदर्भातील अनेक नेते व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि संबंधित संस्थांवर टीका केली. राम मंदिर लूट प्रकरणावर देशात असंतोष असल्याचा दावा करत त्यांनी आजही या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कारवाई झालेली नसल्याचे म्हटले. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या संस्था आणि संघटनांनी पाठिंबा दिलेले काही लोक आजही अयोध्येत असून त्यांनी राम मंदिराची आणि प्रभू रामाची बदनामी केल्याचा आरोप राऊत यांनी केला.

यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवरही संजय राऊत यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात गेले, तर मुख्यमंत्रीपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा विचार स्वतः फडणवीस करतील, असे आपले आकलन असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी 2029 पूर्वी पंतप्रधान व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणारी व्यक्ती राज्याच्या हिताचा विचार करणारी, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी आणि राज्याला योग्य दिशेने घेऊन जाणारी असावी, अशा व्यक्तीला शुभेच्छा देणे हे आपले कर्तव्य असल्याचे राऊत म्हणाले.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कारभारावर झालेल्या आरोपांवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या काळात मंदिराचा निधी सामाजिक कार्यासाठी योग्य पद्धतीने वापरण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. आदेश बांदेकर अध्यक्ष असताना डायलिसिस केंद्रासाठी मशीन खरेदी करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, सत्ता बदलल्यानंतर नवीन व्यवस्थापनाने हा निधी रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित कार्यकर्त्याला पक्षात प्रवेश केल्यासच निधी मंजूर करण्याचे सांगण्यात आल्याचा दावाही राऊत यांनी केला.

आदेश बांदेकर आणि संजय सावंत यांच्या काळात सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे काम उत्तम पद्धतीने झाले असून त्यानंतर तशा प्रकारचे काम झाले नसल्याचेही राऊत यांनी म्हटले. नागपूरातील आगामी रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट पुन्हा एकदा हिंदुत्व आणि मंदिर व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande