
नवी दिल्ली, 11 जुलै (हिं.स.) : राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगासह विविध आजारांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ३९ औषधांची कमाल किरकोळ किंमत निश्चित केली आहे. हा निर्णय औषध आदेश, २०१३ च्या तरतुदींनुसार घेण्यात आला आहे.
एनपीपीएच्या अधिसूचनेनुसार, ही औषधे निर्धारित कमाल किरकोळ किमतीपेक्षा जास्त दराने विकली जाणार नाहीत. रुग्णांना परवडणाऱ्या दरात अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देणे आणि उपचारांचा आर्थिक भार कमी करणे, हा प्राधिकरणाचा उद्देश आहे. या औषधांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल-संबंधित विकार आणि इतर सामान्य आरोग्य समस्यांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनेक औषध प्रकारांचा समावेश आहे. अधिसूचना जारी झाल्याबरोबर नवीन किमती लागू झाल्या आहेत.
अम्लोडिपिन आणि टेल्मिसार्टन टॅब्लेटची किरकोळ किंमत प्रति टॅब्लेट १४.७४ निश्चित करण्यात आली आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आणि जिवाणू संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नेपाफिनॅक या नेत्र द्रावणाची किंमत प्रति मिलिलिटर ६८.६४ निश्चित करण्यात आली आहे. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी करण्यासाठी लिहून दिल्या जाणाऱ्या नेपाफिनॅक या औषधाची किंमत प्रति कॅप्सूल ६.३७ निश्चित करण्यात आली आहे. या यादीमध्ये मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक निश्चित-मात्रेच्या संयुक्त औषधांच्या किमतींचाही समावेश आहे.
एनपीपीएने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, सर्व किरकोळ विक्रेते आणि वितरकांनी उत्पादक कंपन्यांनी जारी केलेली किंमत सूची त्यांच्या दुकानांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. डीपीसीओ २०१३ च्या कलम २४ (४) चा हवाला देत, प्राधिकरणाने म्हटले आहे की प्रत्येक किरकोळ विक्रेता आणि वितरकाने किंमत सूची आणि पुरवणी किंमत सूची ग्राहकांना सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी प्रदर्शित केली पाहिजे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे