
दमास्कस, 12 जुलै (हिं.स.)।पूर्व सीरियामध्ये रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. फरात (युफ्रेटीस) नदी ओलांडत असताना ३५ हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक फेरीबोट पुलाला धडकून उलटली आणि बुडाली. या दुर्घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाला.
सीरियन सिव्हिल डिफेन्सच्या माहितीनुसार, ही दुर्घटना दैर अल-झोर शहरात घडली. फेरीबोट पुलाला धडकल्यानंतर उलटली आणि बुडाली, त्यामुळे त्यातील सर्व प्रवासी पाण्यात पडले. बचाव पथकाने नदीतून १५ हून अधिक जणांची सुखरूप सुटका केली असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध अद्याप सुरू आहे.
सीरियन सिव्हिल डिफेन्सने सांगितले की, आपत्कालीन पथके जिवंत बचावलेल्या लोकांचा शोध घेण्याबरोबरच मृतांच्या पार्थिवांचा शोध घेण्यासाठी परिसरात व्यापक शोधमोहीम राबवत आहेत. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फेरीबोट पुलाला नेमकी कशी धडकली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.
दरम्यान या अपघातानंतरचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये नदीकाठी गोंधळाचे आणि धावपळीचे वातावरण दिसत आहे. व्हिडिओमध्ये बचाव पथकाचे सदस्य आणि स्थानिक नागरिक पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत करताना दिसत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode