मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांचा आकडा ८ वर; सात मृतदेह सापडले तर एकाचा शोध सुरू
पुणे, 12 जुलै (हिं.स.)पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा आता आठवर पोहोचला आहे. दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी शनिवारी (११ जुलै) राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या सात जणांचे मृतदेह बाहेर
hgfh


पुणे, 12 जुलै (हिं.स.)पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा आता आठवर पोहोचला आहे. दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी शनिवारी (११ जुलै) राबविण्यात आलेल्या शोधमोहिमेत इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर कचऱ्याच्या ढिगाखाली अडकलेल्या एका व्यक्तीचा शोध अद्यापही सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

८ जुलै रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास मोशी येथील कचरा डेपोमध्ये 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळल्याने ही दुर्घटना घडली. त्यावेळी इमारतीत २२ आणि इमारतीशेजारी कचऱ्याच्या ढिगाखाली एक असे एकूण २३ जण अडकले होते.

दुर्घटनेनंतर भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले. सुरुवातीला पाच जण स्वतःहून सुरक्षित बाहेर पडले, तर नऊ जणांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, ९ जुलै रोजी भावेश वाणी यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दुर्घटनाग्रस्त इमारत अत्यंत धोकादायक आणि अस्थिर झाल्याने बचावकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले. त्यामुळे १२ पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर मलबा हटविण्याचे काम करण्यात आले. तसेच अत्याधुनिक डिमोलिशन एक्सकॅव्हेटरच्या मदतीने इमारतीचा अस्थिर भाग नियंत्रित पद्धतीने हटविल्यानंतर एनडीआरएफच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली शोधमोहीम अधिक वेगाने राबविण्यात आली.

या शोधमोहिमेदरम्यान अक्षय सावंत (३५, मोशी), सुनील कोरके (४०, आळंदी), सन्नी माने (३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (२६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (२२, मोशी) आणि राहुल गायकवाड (३५, मोशी) यांचे मृतदेह आढळून आले. सर्वांना वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. प्रशासनाकडून कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेवटच्या एका नागरिकाचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, एनडीआरएफचे श्वान पथक आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बचावकार्य अविरत सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande