
हनोई, 12 जुलै (हिं.स.)। व्हिएतनाममधील प्रसिद्ध फू क्वोक बेटाजवळ शनिवारी पर्यटकांनी भरलेली एक वेगवान स्पीडबोट समुद्रात उलटल्याने त्यामध्ये प्रवास करणाऱ्या १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता कारवाई करत व्हिएतनाम पोलिसांनी रविवारी स्पीडबोटच्या ५७ वर्षीय कॅप्टनला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कॅप्टनने समुद्री सुरक्षा नियमांचे उल्लंघन केले होते, ज्यामुळे हा मोठा अपघात घडला.
फू क्वोक विशेष आर्थिक क्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडला. ओशन पियर आयलंड कंपनीची स्पीडबोट पर्यटकांना होन मे रुट येथून आन थोई बंदरापर्यंत घेऊन जात होती. होन मे रुट न्गोआई परिसरापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर ही बोट उलटली, त्यामुळे बोटीत असलेले सर्व प्रवासी समुद्रात पडले. उलटलेली बोट पाहताच परिसरातील इतर पर्यटन नौका मदतीसाठी घटनास्थळी धावून आल्या.
बचावकार्यात सहभागी झालेल्या एका बोटीच्या मालकाने सांगितले की, त्यांची बोट अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचली, मात्र बचाव मोहिमेत अनेक अडचणी आल्या.अनेक पर्यटक उलटलेल्या बोटीच्या आत अडकले होते आणि त्यांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यामुळे केवळ काही जणांनाच शुद्धीमध्ये सुरक्षितपणे बाहेर काढता आले.दुर्घटनेच्या वेळी समुद्रात मोठमोठ्या आणि तीव्र लाटा उसळत होत्या. मात्र पाऊस पडत नव्हता आणि परिसरात इतर पर्यटन नौकांची वाहतूकही सुरू होती.
दरम्यान, हनोई येथील भारतीय दूतावासाने रविवारी माहिती दिली की, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव हो ची मिन्ह सिटी येथे नेण्यात आले आहे, तेथून त्यांना भारतात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दूतावासाच्या माहितीनुसार, बचावण्यात आलेल्या १७ भारतीय पर्यटकांपैकी १६ जण भारतात परतत आहेत. तर एका पर्यटकाची प्रकृती अद्याप गंभीर असून त्यांच्यावर फू क्वोक येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode