
इस्लामाबाद , 13 जुलै (हिं.स.)।इराण-अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींवर सातत्याने परिणाम होत असून तेलाचे दर वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम पाकिस्तानवरही झाला असून तेथे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढीनंतर सार्वजनिक वाहतूक सेवांचे भाडेदेखील वाढले असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
इंधनाच्या वाढलेल्या खर्चाचा हवाला देत वाहतूक व्यावसायिकांनी भाडेदर वाढवले आहेत. तेल दरवाढीनंतर एका थांब्यावरून दुसऱ्या थांब्यापर्यंतचे किमान भाडे 50 पाकिस्तानी रुपये (PKR) निश्चित करण्यात आले आहे. तसेच मालवाहतुकीचा खर्चही झपाट्याने वाढला आहे.कराची ते पेशावर दरम्यान माल वाहून नेणाऱ्या ट्रेलरचे भाडे वाढून 7 लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये महागाईच्या नव्या दबावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्रच्या अहवालानुसार, इंधन दरवाढ जाहीर झाल्यानंतर लगेचच या नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात आली. रावळपिंडीमध्ये स्थानिक वाहतूक सेवांनी प्रति प्रवासी 20 पाकिस्तानी रुपयांची भाडेवाढ केली आहे, तर उपनगर आणि आसपासच्या भागांत धावणाऱ्या सेवांनी प्रति प्रवासी 30 पाकिस्तानी रुपयांनी भाडे वाढवले आहे.
याशिवाय, प्रवाशांच्या सामानासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यासही वाहतूक व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर 8 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांकडूनही पूर्ण भाडे आकारले जात आहे. लांब पल्ल्याच्या बस सेवांनी तिकीट दरात प्रति प्रवासी 100 ते 250 पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढ केली आहे.रावळपिंडी आणि मरी दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित (AC) कोच सेवांचे भाडेही वाढवून 700 पाकिस्तानी रुपये करण्यात आले आहे.
अहवालानुसार, स्थानिक चिंगची रिक्षा, बाईक टॅक्सी आणि मोटारसायकल टॅक्सी सेवांनीदेखील आपले भाडे वाढवले आहे. तसेच लोडर रिक्षांच्या मालवाहतूक शुल्कात 500 पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या अलीकडील दरवाढीनंतर हे सर्व बदल करण्यात आले आहेत.आधीच महागाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये वाढते पेट्रोल-डिझेल दर नागरिकांसाठी आणखी एक डोकेदुखी ठरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode