
तेहरान , 13 जुलै (हिं.स.)।अमेरिका–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक घडामोड सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. इराणमधील एका वृत्तपत्राने सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लक्ष्य केले जाणाऱ्या व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अमेरिका, इस्रायल आणि काही युरोपीय देशांच्या नेत्यांचा समावेश आहे.वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका पोस्टरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि इतर प्रमुख नेत्यांची छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत.
ही यादी इराणची राजधानी तेहरान येथील अधिकाऱ्यांकडून प्रकाशित होणाऱ्या एका वृत्तपत्रात छापण्यात आली आहे. या ग्राफिकसोबत वृत्तपत्राने “अचानक मृत्यूसाठी तयार राहा” अशी मथळी दिली आहे. तसेच मोजतबा खामेनेई यांचे विधानही प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “बदला घेणे ही आमच्या देशाची इच्छा आहे आणि ती निश्चितपणे पूर्ण केली जाईल.” मोजतबा यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर हे वक्तव्य केल्याचे वृत्तपत्रात नमूद करण्यात आले आहे.
वृत्तपत्रात छायाचित्रांसह प्रसिद्ध झालेल्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ, इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माईक हकाबी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांचा समावेश आहे.वृत्तपत्राच्या दाव्यानुसार, या सर्व नेत्यांना इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येसाठी जबाबदार धरले गेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode