इराणवरील अमेरिकेचे हल्ले दुसऱ्या दिवशीही सुरूच; हवाई हल्ल्यांत दोन जणांचा मृत्यू
तेहरान, 13 जुलै (हिं.स.)।इराणवर अमेरिका भीषण बॉम्बहल्ले करत आहे. इराणी सरकारी माध्यमांच्या वृत्तांनुसार, सोमवारी दुपारी झालेल्या ताज्या हल्ल्यांमध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यापूर्वी रविवारीही अमेरिकन सैन्याने इराण
इराणवरील अमेरिकेचे हल्ले दुसऱ्या दिवशीही सुरूच; हवाई हल्ल्यांत दोन जणांचा मृत्यू


तेहरान, 13 जुलै (हिं.स.)।इराणवर अमेरिका भीषण बॉम्बहल्ले करत आहे. इराणी सरकारी माध्यमांच्या वृत्तांनुसार, सोमवारी दुपारी झालेल्या ताज्या हल्ल्यांमध्ये किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यापूर्वी रविवारीही अमेरिकन सैन्याने इराणमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बहल्ले करून त्यांना लक्ष्य केले होते.

इराणच्या अर्ध-सरकारी वृत्तसंस्थेने खुजेस्तान प्रांताच्या उपराज्यपालांच्या हवाल्याने सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे १:४५ वाजता दक्षिण-पश्चिम इराणमधील आबादान शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याशिवाय, आणखी एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास दक्षिण इराणमधील किनारी शहर बंदर अब्बास आणि केश्म बेटाजवळही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीच्या हल्ल्यांनंतर अमेरिकेच्या कारवाईचा व्याप आता होर्मुझ सामुद्रधुनीलगतच्या किनारी भागांपुरता मर्यादित न राहता इराणच्या अंतर्गत भागांपर्यंत विस्तारला आहे.

या तीव्र लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली राजनैतिक चर्चा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. इराणने आरोप केला आहे की, या हल्ल्यांद्वारे अमेरिका ओमानच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या शांतता चर्चेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. या चर्चेचा उद्देश होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करणे हा होता. दोन्ही देशांमध्ये ६० दिवसांच्या आत करार करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, करार होण्यापूर्वीच दोन्ही देशांतील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामिक रिपब्लिकविरोधात अमेरिकेने केलेल्या आक्रमक कारवायांचा तीव्र निषेध केला आहे. मंत्रालयाने या नव्या हल्ल्यांना क्रूर कृत्य ठरवत आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील मूलभूत तत्त्वांचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

सोमवारी जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने म्हटले की, अमेरिकन सरकारने गेल्या २४ तासांत इराणच्या वाहतूक पायाभूत सुविधांवर, मासेमारी नौकांवर, मालवाहू जहाजांवर तसेच हवामानविषयक सुविधा आणि इमारतींवर हल्ले करून युद्धाशी संबंधित अत्यंत गंभीर अपराध केले आहेत. युद्ध समाप्तीसाठी झालेल्या सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसांतच त्यातील जवळपास सर्वच तरतुदींचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले आहे.

दरम्यान, इराणच्या आयआरजीसीने पुन्हा एकदा होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच रविवारी अमेरिकेने इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. होर्मुझ सामुद्रधुनीलगत असलेल्या बंदर अब्बास आणि सिरिक या शहरांमध्येही स्फोट झाले. अमेरिकेने या कारवाईमागील कारण म्हणून इराणी सैन्याने सायप्रसचा ध्वज असलेल्या एका जहाजावर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande