इराणवर अमेरिकेचे पुन्हा हवाई हल्ले; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या संवादाचे आवाहन
वॉशिंग्टन , 13 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने रविवारी रात्री इराणवर पुन्हा एकदा लष्करी हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सांगितले की या कारवाईचा उद्देश होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या नागरी खलाशांवर आणि व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याची इरा
इराणवर अमेरिकेचे पुन्हा हवाई हल्ले; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या संवादाचे आवाहन


वॉशिंग्टन , 13 जुलै (हिं.स.)।अमेरिकेने रविवारी रात्री इराणवर पुन्हा एकदा लष्करी हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सांगितले की या कारवाईचा उद्देश होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या नागरी खलाशांवर आणि व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याची इराणची क्षमता आणखी कमकुवत करणे हा आहे.

सेंटकॉमने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की ही कारवाई अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्देशानुसार करण्यात आली असून, इराणी सैन्याला त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरणे हे तिचे उद्दिष्ट आहे. सेंटकॉमने म्हटले, “आज सायंकाळी ५ वाजता (ईटी) अमेरिकन सेंट्रल कमांडच्या दलांनी इराणवर आणखी एका टप्प्यातील हल्ले सुरू केले. यांचा उद्देश होर्मुझ सामुद्रधुनीतून मुक्तपणे प्रवास करणाऱ्या नागरी खलाशांवर आणि व्यापारी जहाजांवर हल्ले करण्याची इराणची क्षमता आणखी कमी करणे हा आहे. राष्ट्राध्यक्षांनी इराणी सैन्याला जबाबदार धरण्यासाठी या हल्ल्यांचे आदेश दिले आहेत.”

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेल्या अमेरिकन लष्करी हल्ल्यांचा तीव्र निषेध करत त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. मंत्रालयाने आरोप केला की या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या अलीकडील प्रयत्नांना धक्का बसला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने इशारा दिला की जर कोणत्याही देशाने आपल्या भूमीचा किंवा लष्करी तळांचा वापर इराणविरोधी लष्करी मोहिमांसाठी करण्यास परवानगी दिली, तर अशा हल्ल्यांचे उगमस्थान इराणी सशस्त्र दलांच्या दृष्टीने आत्मसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत “वैध लष्करी लक्ष्य” मानले जाऊ शकते.

मंत्रालयाने मस्कत येथे झालेल्या चर्चेच्या निष्कर्षांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कथित विधानालाही फेटाळून लावले. इराणने ते “पूर्णपणे खोटे” असल्याचे म्हटले असून, चर्चेचा मुख्य विषय होर्मुझ सामुद्रधुनी आणि तेथील सागरी वाहतुकीचे व्यवस्थापन हा होता, असे स्पष्ट केले.इराणने संयुक्त राष्ट्र सचिवालयाच्या प्रतिक्रियेवरही टीका केली आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस तसेच सुरक्षा परिषदेकडे अमेरिकन कारवाईसाठी जबाबदार व्यक्तींना उत्तरदायी धरण्याची मागणी केली.अमेरिकन कारवाईनंतर खाडी प्रदेशातील तणाव आणखी वाढला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर दक्षिण इराणमधील जास्क, बंदर अब्बास आणि सिरिक या शहरांमध्ये तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इराण आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या लष्करी संघर्षाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की अलीकडील घडामोडींमुळे प्रदेशासह संपूर्ण जगासाठी गंभीर परिणाम उद्भवू शकतात. गुटेरेस यांनी एक्सवर लिहिले, “खाडी प्रदेशातील गंभीर तणाव आणि इराण-अमेरिका यांच्यात पुन्हा सुरू झालेल्या लष्करी संघर्षाबद्दल मी अत्यंत चिंतित आहे. यात होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांवर इराणने केलेले हल्ले, इराणवरील अमेरिकन हल्ले आणि शेजारी देशांमध्ये इराणकडून करण्यात आलेल्या कारवायांचा समावेश आहे. हे सर्व हल्ले तात्काळ थांबले पाहिजेत.”

त्यांनी इशारा दिला की परिस्थिती पुन्हा सर्वसमावेशक युद्धाकडे गेल्यास त्याचे परिणाम प्रदेशातील जनतेवर, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेवर तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवर अत्यंत विनाशकारी ठरू शकतात. संयुक्त राष्ट्र प्रमुखांनी अमेरिका आणि इराणला तातडीने संवाद पुन्हा सुरू करण्याचे आणि सर्व प्रलंबित प्रश्न कूटनीतिक मार्गाने सोडवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मी इराण आणि अमेरिकेला विनंती करतो की त्यांनी तात्काळ चर्चा पुन्हा सुरू करावी आणि सर्व प्रलंबित मुद्द्यांचे निराकरण राजनैतिक मार्गाने करावे.”

यापूर्वी शनिवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकन सेंट्रल कमांडने या आठवड्यातील इराणविरोधातील तिसऱ्या टप्प्यातील हल्ले पूर्ण केल्याचे जाहीर केले होते. सेंटकॉमने सांगितले की होर्मुझ सामुद्रधुनीतील एका व्यापारी जहाजावरील हल्ल्यासाठी इराणी सैन्याला जबाबदार धरण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.सेंटकॉमच्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने जमिनीवरून आणि समुद्रातून कार्यरत लढाऊ विमाने, ड्रोन आणि नौदल जहाजांच्या मदतीने इराणमधील सुमारे १४० लष्करी ठिकाणांवर अचूक हल्ले केले. यात क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रक्षेपण केंद्रे, नौदल तळ, शस्त्रसाठे, दळणवळण यंत्रणा आणि किनारी निरीक्षण केंद्रांचा समावेश होता.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी दावा केला की होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली आहे. प्रदेशावरील नियंत्रणाबाबत इराणने केलेले दावे फेटाळून लावत त्यांनी म्हटले की अमेरिकन लष्करी कारवाईनंतरही या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून जहाजांची वाहतूक सुरू आहे. एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की इराणबरोबरचे अलीकडील राजनैतिक प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी असेही सांगितले की शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान इराणी प्रतिनिधींनी अनेक महत्त्वाच्या सवलती मान्य केल्या होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, यात इराणचा अणुकार्यक्रम आणि लष्करी उपक्रम पूर्णपणे बंद करण्यासारख्या मुद्द्यांचाही समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande