
अबू धाबी, 14 जुलै (हिं.स.)।संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दावा केला आहे की, इराणने त्यांच्या दोन तेलवाहू जहाजांवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला केला. या हल्ल्यानंतर दोन्ही जहाजांवर भीषण आग लागली. या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात आणखी आठ जण जखमी झाले असून त्यांपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जारी केलेल्या अधिकृत निवेदनात मंत्रालयाने म्हटले की, ओमानच्या सागरी हद्दीत होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिणेकडील मार्गावर असलेल्या मोम्बासा आणि बाहिया या तेलवाहू जहाजांना लक्ष्य करण्यात आले. मंत्रालयाच्या माहितीनुसार, जखमींमध्ये सहा भारतीय नागरिक आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. निवेदनात म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे मोम्बासा या जहाजावरील एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले. त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे दोन्ही जहाजांना आग लागली होती; मात्र नंतर ती पूर्णपणे विझवण्यात आली.
संयुक्त अरब अमिरातीने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यांमध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याबद्दल मंत्रालयाने भारत सरकार आणि तेथील जनतेप्रती तीव्र शोक व्यक्त केला. हा हल्ला गंभीर स्वरूपाचा असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्पष्ट उल्लंघन असल्याचे सांगत, प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्यासाठी तो धोकादायक असल्याचे यूएईने म्हटले आहे. यूएई सरकारने स्पष्ट केले की, या तणावपूर्ण परिस्थितीला उत्तर देण्याचा आपला संपूर्ण अधिकार देश राखून ठेवत आहे आणि आपल्या सार्वभौमत्वाचे, नागरिकांचे, रहिवाशांचे तसेच राष्ट्रीय हितांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
संरक्षण मंत्रालयाने असेही सांगितले की, देशाचे सशस्त्र दल उच्च सतर्कतेवर असून कोणत्याही प्रकारच्या धोक्याला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. यासोबतच, त्यांनी सर्व प्रकारच्या शत्रुत्वाच्या कारवाया त्वरित थांबवण्याची आणि होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली करण्याची मागणी केली. इराणने यापूर्वी केलेल्या त्या दाव्यानंतर यूएईचे हे विधान समोर आले आहे, ज्यामध्ये इराणने म्हटले होते की, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जहाजांवर इशारतीचा गोळीबार केला होता.
दरम्यान इराणच्या सरकारी दूरदर्शनने आपल्या वृत्तात म्हटले होते की, या महत्त्वाच्या सामरिक जलमार्गातून कथितपणे बेकायदेशीररीत्या प्रवास केल्याच्या आरोपावरून त्या जहाजांना इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने डागलेल्या इशारतीच्या गोळ्यांद्वारे लक्ष्य करण्यात आले आणि त्यांना थांबवण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode