
मुंबई, 15 जुलै (हिं.स.)। रेनॉ इंडियाने आपल्या लोकप्रिय डस्टर एसयूव्हीचे नवे डस्टर एडव्हेंचर एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. या विशेष एडिशनची एक्स-शोरूम किंमत १२.९९ लाख रुपयांपासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंटची किंमत १५.३९ लाख रुपये आहे. कंपनीने हे एडिशन मिड-स्पेक इव्होल्यूशन आणि टेक्नो ट्रिमच्या दरम्यान स्थान दिले असून ते दोन्ही टर्बो-पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.
नवीन डस्टर एडव्हेंचर एडिशनमध्ये इव्होल्यूशन ट्रिममधील सर्व फीचर्ससह टेक्नो ट्रिममधील काही प्रीमियम फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये फुल एलईडी हेडलॅम्प, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड टेलगेट आणि ड्युअल-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोलचा समावेश आहे. याशिवाय या विशेष एडिशनमध्ये आकर्षक एडव्हेंचर ग्राफिक्स, डेकोरेटिव्ह एलिमेंट्स आणि खास फ्लोअर मॅट्स देण्यात आले आहेत. तसेच १०.१ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, कनेक्टेड कार सर्व्हिसेस आणि १७ इंचांचे ओशन अलॉय व्हील्सही उपलब्ध आहेत.
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, डस्टर एडव्हेंचर टीसीई१०० (१.० टर्बो) मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत १२.९९ लाख रुपये, डस्टर एडव्हेंचर टीसीई१६० (१.३ टर्बो) मॅन्युअलची किंमत १३.९९ लाख रुपये, तर टीसीई१६० डीसीटी व्हेरिएंटची किंमत १५.३९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे एडव्हेंचर एडिशन डस्टर टेक्नोपेक्षा सुमारे ५० हजार रुपयांनी स्वस्त आहे, तर इव्होल्यूशन व्हेरिएंटच्या तुलनेत त्याची किंमत जास्त आहे.
पॉवरट्रेनबाबत पाहिले तर, या एसयूव्हीमध्ये १.० लिटर टीसीई१०० टर्बो-पेट्रोल इंजिन आणि १.३ लिटर टीसीई१६० टर्बो-पेट्रोल इंजिन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. १.० लिटर इंजिन ९९ बीएचपी पॉवर आणि १६६ एनएम टॉर्क निर्माण करते. तर १.३ लिटर इंजिन १६१ बीएचपी पॉवर आणि २८० एनएम कमाल टॉर्क देते. १.३ लिटर इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर्ड स्वरूपात मिळतो, तर ग्राहकांना ६-स्पीड डीसीटी गिअरबॉक्सचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule