
पिंपरी, 20 जुलै (हिं.स.) । पिंपरी-चिंचवड शहरात किमान ७५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने निश्चित केले असून, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधर मतदारांची नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.कासारवाडी येथे रविवारी झालेल्या बैठकीत पदवीधर मतदार नोंदणी, मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, राजेश पांडे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, शंकर जगताप, अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे आणि पदवीधर नोंदणी प्रमुख राजेश पिल्ले उपस्थित होते.बैठकीत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, पिंपरी-चिंचवडसारख्या शहरात पदवीधर मतदारांची संख्या आणि मतदानाची टक्केवारी वाढवणे हे पक्षाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.ते पुढे म्हणाले की, नगरसेवक आणि संघटना हे वेगळे घटक नसून सर्वांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. पक्षाने निश्चित केलेले ७५ हजार पदवीधर मतदार नोंदणीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करावी. तसेच या मोहिमेतील सक्रिय सहभाग आणि कामगिरीचा विचार भविष्यात पक्षातील विविध पदांच्या वाटपावेळी महत्त्वाचा निकष म्हणून केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु