
वर्धा, 20 जुलै (हिं.स.)। रोठा येथे घडलेल्या १२ वर्षीय बालिकेच्या हत्येच्या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या दोन सदस्यांनी वर्धा गाठून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली व संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी आयोग वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. घटनेनंतर पीडित बालिकेच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य गीतांजली बालाजी बुटी आणि प्रवीण संजाबराव भुजाडे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बाल कल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. पोलिस अधीक्षकांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर आयोगाच्या सदस्यांनी हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीविरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात दाखल करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, संबंधित घटना अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल तातडीने प्राप्त करून महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. शाळाबाह्य व शिक्षणातून गळती झालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच १६ ते १८ वर्षे वयोगटातील विधी संघर्षग्रस्त आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. गाव पातळीवरील बाल संरक्षण समित्यांनी दरमहा नियमित बैठका घेऊन बालकांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्नांवर प्राधान्याने चर्चा करावी, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. बालकांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कटिबद्ध असून, रोठा येथील प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे.
शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवा
बालस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ या विषयावर नियमित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात यावा. तसेच घरातील पालक किंवा इतर व्यक्ती अनुपस्थित असताना अनोळखी व्यक्तींपासून सुरक्षितता कशी राखावी, याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी