
छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै (हिं.स.)डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गिरीष काळे यांनी दिली. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी साडेतीन ते चार लाखाचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलतरफे बागला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले.
या भरती प्रक्रियेस विद्यापीठातील विभाग तसेच संलग्न महाविद्यालयांतील बी.एस्सी., एम.एस्सी., बी.ई., बी.टेक., एम.ई. आणि एम.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स) शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कंपनीचे प्रतिनिधी दीपक पटनायक तसेच अनुज शर्मा यांनी सुरुवातीला कंपनीची माहिती, कार्यसंस्कृती आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी याविषयी सादरीकरण केले. त्यानंतर लेखी परीक्षा व वैयक्तिक मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेत ११ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यांना कंपनीतर्फे नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
सीआयआय मॉडेल करिअर सेंटरच्या संपूर्ण टीमने या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हच्या नियोजनापासून विद्यार्थी नोंदणी, समन्वय, आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणीपर्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य केले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे भरती प्रक्रिया सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडली. यावेळी डॉ. गिरीश काळे, प्लेसमेंट ऑफिसरयांनी बागला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनाचे व भरती पथकाचे विद्यापीठात कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून इतर विद्यार्थ्यांनीही भविष्यातील कॅम्पस प्लेसमेंट उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis