
वर्धा 20 जुलै (हिं.स.)।गिरड व्याघ्र प्रकल्प परिसरातील पिंपळगाव, उंदिरगाव, साखरा, जोगीनगुंफा, पिंपरी व रासा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या वाघीणीला वनविभागाने अखेर जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. शिवणफळ बिटातील कक्ष क्रमांक ३१९ मध्ये ही वाघीण पिंजऱ्यात अडकविण्यात आली. ही वाघीण गिरडच्या ‘राणी’ वाघिणीच्या दोन वर्षांपूर्वी जन्मलेल्या पिल्लांपैकी एक असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती विविध गावांमध्ये फिरत होती. तिने काही जनावरे ठार केली तर काहींना जखमी केल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वाघिणीला पकडण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपवनसंरक्षक हरवीर सिंग व सहाय्यक वनसंरक्षक हरीश सरोदे यांनी वाघिणीला पकडण्याचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी पाठविला. आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या दोन दिवसांत परवानगी मिळाल्याचे वनविभागाने सांगितले. १८ जुलै रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल ढोणे यांच्या नेतृत्वाखाली वर्धा वन्यजीव बचाव केंद्र, गोंदिया येथील एनएनटीआर पथक आणि वनविभागाने शिवणफळ बिटात सर्च मोहीम राबविली. सापळ्यासाठी ठेवलेल्या जनावरावर वाघीणीने हल्ला केल्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत अवघ्या २४ तासांत तिला पिंजऱ्यात अडकविले. या मोहिमेत शूटर आशिष रामटेके, डॉ. मेघराज तुलावी, प्रणित सुर, भीमाशंकर तेली, क्षेत्रसहाय्यक जी.पी. राऊत, वनरक्षक पी.डी. बेले, रमेश चौके, कामतवार, कोंडबा गुंडप्पा, अमोल पिसे, पटले तसेच वनमजूर व टीआरपी पथकाने सहभाग घेतला. वाघिणीला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून, ही कारवाई यशस्वी केल्याबद्दल आमदार समीर कुणावार यांनी संपूर्ण वनविभागाच्या पथकाचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी