
पुणे, २० जुलै: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळीच्या संशयावरून पुणे जिल्ह्यातील यवत परिसरातील गुऱ्हाळांवर कारवाई करत लाखो रुपयांचा गूळ जप्त केला आहे. मात्र, प्रयोगशाळेचा अहवाल मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे जप्त गूळ खराब होण्याची भीती निर्माण झाली असून, गूळ उत्पादक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
सध्या पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाने घेतलेले गुळाचे नमुने तपासणीसाठी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातात. पुण्यात एफडीएची स्वतंत्र प्रयोगशाळा नसल्याने तपासणी प्रक्रियेला विलंब होत आहे. विशेषतः मुंबई येथील प्रयोगशाळेवर कामाचा वाढता ताण असल्याने अहवाल मिळण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागत असल्याचे सांगितले जात आहे.
प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत जप्त केलेला गूळ विक्रीसाठी उपलब्ध होत नसल्याने उत्पादक आणि व्यापाऱ्यांचे मोठे भांडवल अडकून पडत आहे. दीर्घकाळ साठवणुकीमुळे गुळाचा दर्जा आणि गुणवत्ता खालावण्याची शक्यता असल्याने प्रामाणिक उत्पादकांनाही आर्थिक फटका बसत असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पुणे ग्रामीणमधील यवत आणि दौंड परिसरात एफडीएकडून सातत्याने कारवाया सुरू असून, त्याचा परिणाम सुमारे ४०० गुऱ्हाळांवर झाला आहे. त्यामुळे तपासणी प्रक्रिया जलद आणि पारदर्शक करण्यासाठी पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची स्वतंत्र प्रयोगशाळा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी गूळ उत्पादकांकडून करण्यात येत आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु