फ्रंट सीटवर प्रवासी बसविणाऱ्या १६ रिक्षा चालकांवर लातूर पोलिसांची कारवाई
लातूर, 20 जुलै (हिं.स.)लातूर शहरात रिक्षाच्या फ्रंट सीटवर अवैधरित्या प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध लातूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत १६ चालकांवर कारवाई केली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित चालकांविरुद्ध कलम
पोलीस कारवाई


लातूर, 20 जुलै (हिं.स.)लातूर शहरात रिक्षाच्या फ्रंट सीटवर अवैधरित्या प्रवासी बसवून वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध लातूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत १६ चालकांवर कारवाई केली. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित चालकांविरुद्ध कलम ६६/१९२ अन्वये खटले दाखल करण्यात आले.

लातूर शहरात काही रिक्षा चालकांकडून फ्रंट सीटवर प्रवासी बसवून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक नागेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ ऑटोचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोच्या फ्रंट सीटवर प्रवासी बसविल्यास चालकाचे वाहनावरील नियंत्रण कमी होण्याची शक्यता असते. अचानक ब्रेक लावणे, धडक होणे किंवा अपघात घडल्यास फ्रंट सीटवरील प्रवाशाला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची वाहतूक ही केवळ नियमभंग नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब आहे.

लातूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ही कारवाई केवळ दंडात्मक नसून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येत आहे. यापुढेही अशा नियमभंगाविरुद्ध सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून वाहतूक नियंत्रण शाखेला नियमित कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.

लातूर जिल्हा पोलीस दलाने सर्व रिक्षाचालकांना वाहन परवान्यात नमूद केलेल्या क्षमतेनुसारच प्रवाशांची वाहतूक करण्याचे तसेच फ्रंट सीटवर किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर पद्धतीने प्रवासी न बसविण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande