
वर्धा, 20 जुलै (हिं.स.)
कौटुंबिक कलह, पती-पत्नीमधील वाद आणि गैरसमजांमुळे विस्कटलेल्या संसारांना पुन्हा प्रेमाचा आधार देण्याचे महत्त्वपूर्ण काम वर्धा येथील भरोसा सेल अतिशय प्रभावीपणे करत आहे. माहे जानेवारी ते जून २०२६ या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींपैकी तब्बल १७२ पती-पत्नींमधील वाद मिटवून त्यांचे संसार पुन्हा उभे करण्यात सेलला यश आले आहे.
वर्धा जिल्हा पोलिस घटकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये महिलांच्या कौटुंबिक वादाच्या आणि पती-पत्नीमधील वादाच्या अनेक तक्रारी दाखल होत असतात. या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने अर्जदार महिला व गैरअर्जदार पुरुष यांना भरोसा सेल येथे समक्ष बोलावले जाते. तेथे तज्ज्ञांमार्फत त्यांचे समुपदेशन करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाते. भरोसा सेलचे कार्य केवळ तडजोड घडवून आणण्यापुरते मर्यादित नाही. पीडित महिला आणि मुलींचे योग्य समुपदेशन केल्यानंतर, ज्या पती-पत्नींमध्ये आपसी समजोता झाला आहे, ते एकत्र राहून चांगल्या प्रकारे संसार करत आहेत की नाही, याची खात्री केली जाते. समेट घडवून आणलेल्या प्रत्येक प्रकरणातील अर्जदारांना ठराविक कालावधीनंतर फोन करून त्यांचा पाठपुरावा केला जातो. पीडित महिला आणि मुलींना त्यांच्या गरजेनुसार मोफत वैद्यकीय सेवा आणि मानसोपचार सेवा पुरविण्यात येते. तसेच महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करून कायदेशीर मार्गदर्शन केले जाते. ज्या प्रकरणांमध्ये कौटुंबिक कलह तीव्र असतो आणि समजोता होऊ शकत नाही, अशा वेळी पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मोफत विधी सल्लागारांमार्फत कायदेशीर मदत दिली जाते.
पोलिस प्रशासनाचे आवाहन
कौटुंबिक वाद रस्त्यावर न आणता किंवा घाईघाईने टोकाचा निर्णय न घेता, पीडित महिलांनी आणि कुटुंबियांनी संयम ठेवावा. घरगुती वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी वर्धा पोलीस प्रशासनाच्या 'भरोसा सेल'शी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस विभागामार्फत करण्यात आले आहे. भरोसा सेलमुळे आज अनेक घरे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असून, शेकडो महिलांना हक्काचा मानसिक आणि कायदेशीर आधार मिळाला आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी