
यवतमाळ 20 जुलै (हिं.स.)। उमरखेड तालुक्यातील ग्रामपंचायत सुकळी (ज.) येथील प्रभारी सरपंच तथा उपसरपंच शिवाजी सदाशिव रावते यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम अन्वये उपसरपंच, प्रभारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
अमरावती विभागाचे अपर आयुक्त यांनी १४ जुलै रोजी हा आदेश पारित केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या अर्जात शिवाजी रावते यांनी प्रभारी सरपंच म्हणून कार्यरत असताना सुकळी (ज.) येथील सर्वे क्रमांक १३२ मधून नियमबाह्य व बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन करून त्याची विक्री केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच १४ वा व १५ वा वित्त आयोगाच्या निधीतील अनियमितता, सरपंचांच्या कथित बनावट स्वाक्षर्!यांचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही नमूद करण्यात आले होते. प्रकरणाच्या चौकशीत चंद्रपूर येथील ईटीएसच्या अहवालानुसार तब्बल तीन हजार ५५६ ब्रास अवैध मुरूम उत्खनन झाल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, तहसीलदार उमरखेड यांनी ८३९ ब्रास उत्खनन ग्राह्य धरून ६२ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनीही कायम ठेवला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कलम ३९ (१) अंतर्गत कारवाईची शिफारस अपर आयुक्तांकडे केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईची शिफारस अपर आयुक्तांकडे केली होती.
सुनावणीदरम्यान तक्रारदाराने रावते यांना पदावरून अपात्र ठरवून वाढीव दंड आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. तर गैरअर्जदाराच्या वकिलांनी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने कारवाई करता येणार नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, अपर आयुक्तांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अहवाल, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध कागदपत्रांचा सखोल विचार करून रावते यांनी कर्तव्यात कसूर व अनियमितता केल्याचे स्पष्ट होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे अपर आयुक्तांनी तक्रादाराचा अर्ज मंजूर करत शिवाजी सदाशिव रावते यांना उपसरपंच, प्रभारी सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधितांना आदेशाची माहिती देऊन प्रकरणाची संचिका अभिलेख कक्षात पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे सुकळी (ज.) ग्रामपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी