
वर्धा, 20 जुलै (हिं.स.)। आर्वी-देऊरवाडा-अमरावती या वर्दळीच्या राज्य महामार्गावर नांदपूर ते कर्माबाद दरम्यान एक महाकाय झाड पूर्णपणे वाळून गेले असून, ते केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. हा महामार्ग वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. त्यामुळे या रस्त्यावर सदैव वाहनांची ये-जा असते. यामध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस, शासकीय आणि खाजगी प्रवासी वाहने, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, व्यापाऱ्यांची मालवाहू वाहने आणि दुचाकीस्वारांचा समावेश असतो. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी हे वाळलेले झाड तत्काळ कापून टाकण्याची मागणी केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने वादळी वारे आणि पावसामुळे हे जीर्ण झालेले झाड थेट रस्त्यावर पडून मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गाने दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असून, या 'उभ्या मृत्यू' कडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी आणि निष्पाप लोकांचा जीव जाण्यापूर्वी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा वन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी आर्त हाक प्रवासी आणि नागरिक देत आहेत. प्रशासन एखाद्या मोठ्या अनर्थाची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवालही आता उपस्थित केला जात आहे.
प्रशासनाची डाेळेझाक
हे झाड पूर्णपणे पानगळ झालेले, वाळलेले झाड थेट डांबरी रस्त्याच्या कडेला आणि वीजेच्या तारांच्या अगदी जवळ उभे आहे. त्याच्या फांद्या रस्त्यावर झुकलेल्या आहेत. एखादा दुचाकीस्वार किंवा वाहन जवळून जात असताना जोराचा वारा सुटल्यास किंवा पाऊस पडल्यास हे झाड कोसळून जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. हे झाड कित्येक महिन्यांपासून याच स्थितीत उभे आहे, मात्र प्रशासनाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी