
छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै (हिं.स.)। आमदार नारायण कुचे यांचे सहकारी पंढरपूर दर्शनासाठी जात असताना जामखेड फाटा येथे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आणि उपचारासाठी त्यांना कलावती हॉस्पिटल जालना येथे दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने जालना शहरातील कलावती हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी अपघाताची संपूर्ण माहिती आमदार नारायण कुचे यांना दिली. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली. डॉक्टरांनी सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जखमींना धीर देत, “पांडुरंगाच्या कृपेने सर्वांची प्रकृती स्थिर असून सर्वजण लवकर बरे होतील,” अशी सदिच्छा व्यक्त केली. या प्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ. जे. बोराडे, नितीन जांगडे, धनराज बटावाले आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis