
बीड, 20 जुलै (हिं.स.)। बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीदरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुस्कान सिद्दिक शेख आणि छाया गणेश पांचाळ यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्यचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज ् (दि. २०) सोमवार रोजी जिल्हा रुग्णालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले.
यावेळी मुस्कान शेख यांना न्याय द्या' छाया पांचाळ यांना न्याय द्या, ' दोषीं वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आणि आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते युनुस शेख, मुबीन शेख, शिवशर्मा शेलार, भिमराव कुटे,किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवा भावी संस्था बहिरवाडी बीड), बाळासाहेब मोरे पाटील (प्रांताध्यक्ष, भीमशक्ती-शिवशक्ती विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे, सादेक सय्यद (बीड शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी), पठाण रफिक (बीड जिल्हा उपप्रमुख आम आदमी पार्टी बीड), राजेंद्र आमटे ( शेतकरी हक्क आंदोलक), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय तांदळे, लेक लाडकी अभियानचे बाजीराव ढाकणे, शेख आकरम, सत्तार रज्जाक,मोईन सरफोद्दीन, समाजसेवक सरफराज,शेख मुबारक,महेमुद मुबारक
आदी सहभागी होते.
बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीदरम्यान मुस्कान सिद्दिक शेख आणि छाया गणेश पांचाळ मृत्यूची प्रकरणे घडली असून, संबंधितांवर अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. चौकशी समित्यांवर समित्या नेमून वेळकाढूपणा केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis