
रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या सुरक्षित आणि सुदृढ भविष्यासाठी पालकांनी मोबाइलच्या वापराबाबत सजग राहणे अत्यंत आवश्यक असले, तरी मोबाइल नव्हे, तर पालकांचा संवादच मुलांचे भविष्य घडवतो, असे प्रतिपादन डॉ. अक्षय फाटक यांनी केले.
येथील कीर्तनसंध्या ट्रस्ट आणि डॉ. अक्षय फाटक यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर संस्कार या उपक्रमांतर्गत गुगल पेरेंटल कंट्रोल या विषयावरील मार्गदर्शनपर सेमिनार रा. भा. शिर्के प्रशालेतील बाबासाहेब नानल गुरुकुल प्रकल्प आणि ल. ग. प. विद्यामंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या सेमिनारला सुमारे २०० पालक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
डॉ. फाटक यांनी पालक आणि पाल्य यांच्यातील कमी होत चाललेला संवाद, त्या जागी मोबाइलने घेतलेले स्थान आणि त्यामुळे मुलांच्या मानसिक, बौद्धिक तसेच सामाजिक विकासावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पालकांनी अनेकदा मुलांना विविध कारणांसाठी मोबाइल दिल्यानंतर आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हे तसेच अयोग्य डिजिटल सामग्रीच्या संपर्कात येण्याचा धोका वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांवरील अयोग्य तपशिलाचा मुलांवर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणाऱ्या चुकीच्या सवयी, अभ्यासावरील एकाग्रता कमी होणे, बौद्धिक क्षमतेवर होणारे विपरीत परिणाम आणि यावर उपाय म्हणून Google Parental Control चा प्रभावी वापर कसा करावा याची प्रात्यक्षिकांसह माहिती त्यांनी दिली. मुलांशी नियमित संवाद साधणे, डिजिटल शिस्त लावणे आणि तंत्रज्ञानाचा संतुलित वापर करणे हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी तसेच शिल्पाताई पटवर्धन यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रा. भा. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, बाबासाहेब नाना गुरुकुल प्रकल्पाचे मुख्याध्यापक, लगपचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपस्थित पालकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.दरम्यान, दुपारी पटवर्धन हायस्कूलमध्येही याच विषयावरील दोन सेमिनार पार पडले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी