
बीड, २० जुलै (हिं.स.) : बीड जिल्हा रुग्णालयातील खाटांची कमतरता आणि रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी सुमारे २४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले १०० खाटांचे 'माता व बाल रुग्णालय' नुकतेच रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या दहा दिवसांतच येथील मूलभूत सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावरील प्रतीक्षागृहात वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. मात्र, सध्या हे सर्व वॉटर फिल्टर बंद अवस्थेत असल्याने रुग्ण व नातेवाईकांना बाहेरून बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या नव्या रुग्णालयात उद्घाटनानंतर काहीच दिवसांत पिण्याच्या पाण्याची सुविधा ठप्प होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.
यापूर्वीही या नव्या इमारतीत उद्घाटनापूर्वी छताला गळती लागून पीओपी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच लिफ्ट वारंवार बंद पडल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. काही प्रसंगी रुग्णांना झोळीतून वरच्या मजल्यावर नेण्याची वेळ आल्याचे प्रकारही समोर आले होते.
आता वॉटर फिल्टरही बंद पडल्याने रुग्णालयातील मूलभूत सुविधांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे. नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयात अशा सुविधा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा रुग्ण व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis