
अमरावती, 21 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यात तब्बल दहा दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर झालेल्या हलक्या सरींमुळे खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उशिरा झालेल्या पेरण्या आणि त्यानंतरच्या दीर्घ पावसाच्या खंडामुळे सुकण्याच्या मार्गावर असलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून त्यानंतर चार दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे रखडलेल्या सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण होण्यास गती मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यात 19 जुलैपर्यंत सरासरी 315.7 मिलिमीटर पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ 203.5 मिलिमीटर पाऊस झाला असून 35.5 टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे ही तूट काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भातकुली, अचलपूर, चिखलदरा, अमरावती आणि धामणगाव रेल्वे तालुक्यांत पावसाची मोठी कमतरता जाणवत आहे. बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे अनेक शेतांमध्ये उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका बसला आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पिकांची वाढ सुधारेल; मात्र पावसाची अनिश्चितता कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी