
रायगड, 21 जुलै (हि.स.)। शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या पाल्यांसाठी राज्य शासनामार्फत विशेष गौरव पुरस्कार व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एकरकमी 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंतचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे सादर करावेत, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत नारायण फाटक यांनी केले आहे.
योजनेनुसार, शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक आणि बारावीच्या परीक्षेत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या माजी सैनिक व वीरपत्नींच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच राज्याच्या गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय, दहावी व बारावीच्या परीक्षेत 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या माजी सैनिक व वीरपत्नींच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करावेत.
राज्य शासनाच्या या प्रोत्साहनपर योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)