
अमरावती, 21 जुलै (हिं.स.) । नागपूरच्या धर्तीवर आता अमरावती विभागातीलही प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची शालार्थ आयडी घोटाळ्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी, अशी खळबळजनक मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा शिंदेसेना उपजिल्हाप्रमुख सुनील केने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र पाठवून विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये शालार्थ आयडी वाटपात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा थेट आरोप केला आहे.
विभागाचा कारभार शिक्षण उपसंचालक कार्यालयातून चालविला जातो. मात्र, मागील काही वर्षात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातून शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शालार्थ आयडीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचा संशय केने यांनी व्यक्त केला. सुनील केने यांनी पत्रात म्हटले आहे की, नागपूरच्या धर्तीवर अमरावती उपसंचालक कार्यालयाची झाडाझडती घेणे गरजेचे आहे. या विभागातही बोगस शिक्षकांच्या नावावर बेकायदेशीर नियुक्त्या मंजूर करून शालार्थ आयडी बहाल करण्यात आले असून, यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 'हात ओले' केले आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून विशेष चौकशी समिती नेमून केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
पाचही जिल्ह्यांचे रॅकेट रडारवर
अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या पाचही जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत काही वर्षांत मंजूर झालेल्या सर्व शालार्थ आयडींची पुनर्तपासणीसाठी आक्रमक भूमिकेच्या तयारीत संघटना आहेत.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील केने म्हणाले की, विभागात शालार्थ आयडी देण्याच्या नावाखाली पात्र शिक्षकांना डावलून बोगस लोकांची कामे केली गेली. या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी नागपूर विभागाप्रमाणेच अमरावती विभागाची उच्चस्तरीय चौकशी तत्काळ सुरू व्हावी, हीच आमची शासनाकडे मागणी आहे
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी