‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत रोईंग व कुस्ती खेळांसाठी फेरनिवड चाचणीचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.) :क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. या केंद्रासाठी रोईंग आणि कुस्ती य
‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत रोईंग व कुस्ती खेळांसाठी फेरनिवड चाचणीचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.) :क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहे. या केंद्रासाठी रोईंग आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांच्या खेळाडूंची फेरनिवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.

पुणे विभागासाठी ऍथलेटिक्स, शूटिंग, रोईंग, कुस्ती, टेबल टेनिस आणि हॉकी या सहा क्रीडा प्रकारांसाठी खेळाडूंची निवड चाचणी दि. 23 व 24 मार्च 2026 रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी (पुणे) येथे घेण्यात आली होती. मात्र, रोईंग आणि कुस्ती या दोन खेळांसाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिवड चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रोईंगसाठी 22 जुलै रोजी निवड चाचणी

रोईंग या क्रीडा प्रकाराची फेरनिवड चाचणी दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता क्रीडा संकुल, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर, पुणे येथे होणार आहे.

या निवड चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी रोईंग प्रशिक्षक श्री. संदीप भापकर (मो. 9822235577) यांच्याशी संपर्क साधता येईल.

कुस्तीसाठी 24 जुलै रोजी निवड चाचणी

कुस्ती या क्रीडा प्रकाराची फेरनिवड चाचणी दि. 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, माळेगाव-नीरा बारामती रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.

या चाचणीसंदर्भात अधिक माहितीसाठी श्री. शेलार (क्रीडा शिक्षक – मो. 9075107121) तसेच श्री. रणवरे (क्रीडा शिक्षक – मो. 9423240280) यांच्याशी संपर्क साधता येईल.

आवश्यक कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन

निवड चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे तसेच शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र ही मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

विभागस्तरीय क्रीडा निपुणता केंद्राच्या प्रवेशासाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले अथवा राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळविलेले आणि 31 डिसेंबरपर्यंत 25 वर्षांपर्यंत वय असलेले इच्छुक खेळाडू या चाचणीसाठी पात्र असतील.

निवड झालेल्या खेळाडूंना विविध सुविधा

निवड प्रक्रियेत यशस्वी ठरणाऱ्या खेळाडूंना निवास, भोजन, पूरक आहार, क्रीडा व प्रशिक्षण साहित्य, देशांतर्गत व परदेशातील प्रशिक्षण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभागाचा खर्च, वैद्यकीय तपासण्या तसेच किरकोळ वैद्यकीय खर्चाचा लाभ विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, पुणे विभाग, पुणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेअंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या निवड चाचण्यांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande