रायगड-मोहाचीवाडी पुलाचे काम पूर्ण; महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाईची मागणी
रायगड, 21 जुलै (हिं.स.) कर्जत-कल्याण महामार्ग क्रमांक 76 वरील नेरळ येथील मोहाचीवाडी पुलाचे रखडलेले काम संबंधित ठेकेदाराने तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीस खुला केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, याचवेळी महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर
Construction of Mohachiwadi bridge completed; demand for action against encroachments on the highway.


रायगड, 21 जुलै (हिं.स.) कर्जत-कल्याण महामार्ग क्रमांक 76 वरील नेरळ येथील मोहाचीवाडी पुलाचे रखडलेले काम संबंधित ठेकेदाराने तातडीने पूर्ण करून पूल वाहतुकीस खुला केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, याचवेळी महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही कारवाई न केल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

मानवाधिकार संरक्षण संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष गोरख शेप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुलाचे काम वेळेत पूर्ण करणाऱ्या ठेकेदाराचे कौतुक केले आहे. मात्र, यापूर्वी पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामातील दिरंगाईकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, नेरळ हद्दीतील सुमारे चार किलोमीटरच्या परिसरात महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याची कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

महामार्गावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून महामार्ग मोकळा करावा तसेच रखडलेल्या कामांसाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी गोरख शेप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande