रेवस बंदरावरील रो-रो जेट्टीला विलंब; खर्चात तब्बल 58 टक्क्यांनी वाढ
रायगड, 21 जुलै, (हिं.स.)। : रेवस बंदरावर प्रस्तावित रो-रो जेट्टीचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडल्याने प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 13 कोटी 67 लाख 51 हजार 335 रुपयांची वाढ झाली आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम पूर्ण न झाल्याने त्याची हकालपट्टी करण्
Delay in Revas Port Ro-Ro jetty; cost rises by a staggering 58 percent.


रायगड, 21 जुलै, (हिं.स.)। : रेवस बंदरावर प्रस्तावित रो-रो जेट्टीचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडल्याने प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 13 कोटी 67 लाख 51 हजार 335 रुपयांची वाढ झाली आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम पूर्ण न झाल्याने त्याची हकालपट्टी करण्यात आली असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने 37 कोटी 4 लाख 2 हजार 549 रुपयांच्या सुधारित खर्चास मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत सागरमाला योजनेंतर्गत रेवस-करंजा दरम्यान प्रवासी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी दोन्ही बंदरांवर जेट्टी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सुरुवातीला रेवस जेट्टीसाठी 23 कोटी 36 लाख 51 हजार 214 रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र 2020 पासून सुरू असलेले काम ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे रखडले. आतापर्यंत सुमारे 13 कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित कामांसाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण झाले असून त्यावर 5 कोटी 59 लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र जोडरस्त्याच्या कामाला स्थानिकांचा विरोध असल्याने तेथूनही सेवा सुरू होऊ शकलेली नाही.

विशेष म्हणजे, रेवस-करंजा सागरी पुलाला मंजुरी मिळाल्याने भविष्यात हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांत वाहनाने करता येणार आहे. त्यामुळे पूल पूर्ण झाल्यानंतर वाहनांसह रो-रो जहाजातून प्रवास करण्यास कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी, वाढता खर्च, रखडलेली कामे आणि भविष्यातील व्यवहार्यता यामुळे रेवस रो-रो प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande