
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-2026 कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. कोकण, मुंबई तसेच राज्यातील काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गृहभेटी व गणना कार्यक्रमात व्यत्यय आल्याने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची विनंती भारत निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत गृहभेटींचा कालावधी 8 ऑगस्ट 2026 असा निश्चित करण्यात आला असून, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे काम 8 ऑगस्ट 2026पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मतदार याद्यांचा प्रारूप मसुदा 17 ऑगस्ट 2026 (सोमवार) रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत मतदारांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत करण्यात येईल. यानंतर अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर 2026 (सोमवार) रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास सहकार्य करून गृहभेटीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत. तसेच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची व तपशीलांची खात्री करून आवश्यक असल्यास विहित कालावधीत दावे व हरकती दाखल कराव्यात, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चौंडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis