विश्वचषक अंतिम सामन्यानंतर मैदानावर झालेल्या हाणामारीची फिफाकडून चौकशी
झुरिच (स्वित्झर्लंड), 21 जुलै (हिं.स.) फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर स्पेनने अतिरिक्त वेळेत १-० असा विजय मिळवल्यानंतर झालेल्या सामन्यानंतरच्या हाणामारीची चौकशी करण्यासाठी फिफाने एका शिस्तपालन आणि नीतिमत्ता अभियोक्त्याची नियुक्
विश्वचषक अंतिम सामन्यानंतर मैदानावर झालेल्या हाणामारीची फिफाकडून चौकशी


झुरिच (स्वित्झर्लंड), 21 जुलै (हिं.स.) फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनावर स्पेनने अतिरिक्त वेळेत १-० असा विजय मिळवल्यानंतर झालेल्या सामन्यानंतरच्या हाणामारीची चौकशी करण्यासाठी फिफाने एका शिस्तपालन आणि नीतिमत्ता अभियोक्त्याची नियुक्ती केली आहे.

न्यू जर्सीमध्ये अंतिम शिट्टी वाजल्यानंतर तणाव वाढला होता. जागतिक फुटबॉलच्या नियामक संस्थेने पुष्टी केली आहे की, स्पेनने आपले दुसरे विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर दोन्ही बाजूंचे फुटबॉलपटू आणि संघ अधिकारी यांच्यात झालेल्या गोंधळाच्या दृश्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मात्र, फिफाने शिस्तपालन कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा स्पष्ट केलेली नाही. अंतिम शिट्टी वाजल्यानंतर काही क्षणांतच हे तणावपूर्ण दृश्य घडले, ज्यात अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिआंद्रो पारेडेस स्पेनचा बचावपटू एरिक गार्सिया याच्याशी भिडला आणि त्यानंतर या वादाचे रूपांतर फुटबॉलपटू, बदली फुटबॉलपटू आणि दोन्ही संघांच्या प्रशिक्षक वर्गातील सदस्यांचा समावेश असलेल्या मोठ्या संघर्षात झाले.

दूरचित्रवाणीवरील फुटेजमध्ये पॅरेडेसने गार्सियाच्या गळ्यावर हात ठेवल्याचे दिसले, ज्यामुळे तो स्पॅनिश बचावपटू जमिनीवर कोसळला. स्पेनचा मिडफिल्डर गावी देखील यात सामील होता, आणि दोन्ही संघांतील फुटबॉलपटूंनी एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यानंतर अधिकारी आणि सहकाऱ्यांनी हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली.

या गोंधळादरम्यान अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी आपल्या फुटबॉलपटूंना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. सामन्याच्या निर्धारित वेळेच्या शेवटच्या टप्प्यात अर्जेंटिनाचे १० फुटबॉलपटू मैदानात असताना, आधीच तणावपूर्ण असलेल्या सामन्याचा शेवट अत्यंत तणावपूर्ण झाला.

स्पेनचा बचावपटू पाऊ कुबार्सीवर केलेल्या चुकीच्या टॅकलसाठी मिडफिल्डर एन्झो फर्नांडिसला दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आले. २०१० च्या अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध नेदरलँड्सचा बचावपटू जॉन हेइटिंगाला बाहेर काढल्यानंतर, फिफा विश्वचषक अंतिम सामन्यातून बाहेर काढला गेलेला तो पहिला फुटबॉलपटू ठरला.

फर्नांडिझला मिळालेले रेड कार्ड हे १६ वर्षांनंतर विश्वचषक अंतिम सामन्यात खेळाडूला बाहेर काढण्याची पहिलीच घटना होती. या संघर्षानंतरही वातावरण शांत झाले. स्पेनच्या अनेक खेळाडूंनी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीला मिठी मारली, तर स्कालोनी आणि स्पेनचे प्रशिक्षक लुईस दे ला फुएंते यांनी मिडफिल्डवर एकमेकांना बराच वेळ मिठी मारली.

बदली फुटबॉलपटू फेरान टोरेसने १०६ व्या मिनिटाला निको विल्यम्सच्या हेडर असिस्टवर सर्वात जलद प्रतिक्रिया देत निर्णायक गोल केला आणि अतिरिक्त वेळेनंतर 'ला रोजा'ला १-० असा विजय मिळवून देत स्पेनने विजेतेपद पटकावले.

लुईस दे ला फुएंतेच्या संघाने अंतिम सामन्यावर वर्चस्व गाजवले, चेंडूवर ताबा मिळवला आणि चांगल्या संधी निर्माण केल्या. दुसरीकडे, अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने १२ बचाव करत आपल्या संघाला सामन्यात टिकवून ठेवले, अखेरीस टोरेसने गोल करून सामन्यातील कोंडी फोडली.

या विजयामुळे स्पेनने आपला दुसरा फिफा विश्वचषक किताब पटकावला, २०१० मध्ये पहिले विजेतेपद पटकावल्यानंतरची १६ वर्षांची प्रतीक्षा संपवली आणि युएफा युरो २०२४ मधील विजयानंतर सुरू झालेली आपली अपराजित मोहीम पूर्ण केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande