फिफा विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवानंतर लिओनेल मेस्सीची भावूक पोस्ट
नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) । फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनकडून पराभव झाल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने एक भावनिक संदेश जारी करून चाहत्यांचे आभार मानले. मेस्सी म्हणाला की, या पराभवाची वेदना खूप खोल आहे आणि त्यातून सा
लिओनेल मेस्सी


नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.) । फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनकडून पराभव झाल्यानंतर अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने एक भावनिक संदेश जारी करून चाहत्यांचे आभार मानले. मेस्सी म्हणाला की, या पराभवाची वेदना खूप खोल आहे आणि त्यातून सावरण्यासाठी वेळ लागेल, पण संपूर्ण स्पर्धेत संघाने दिलेल्या लढ्याचा त्याला अभिमान आहे.

सोशल मीडियावर स्पॅनिश भाषेत दिलेल्या आपल्या संदेशात मेस्सी म्हणाला, वेदना खूप खोल आहे आणि त्यातून सावरण्यासाठी वेळ लागेल. पण मी सर्व चांगल्या क्षणांनाही जपून ठेवीन... जे सामने आम्ही पुनरागमन करून जिंकले, ज्या सामन्यांमध्ये आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावले. ते क्षण आमच्या आठवणीत कायम कोरले जातील. संपूर्ण देशाचा पाठिंबा आणि या संघाची मेहनत व समर्पण यामुळे आम्ही पुन्हा एकदा जगातील सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवले आहे.

तो पुढे म्हणाला, ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि संदेश पाठवले त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा, आम्ही संपूर्ण देशाला एकत्र आणू शकलो आणि अर्जेंटिनाचे नागरिक असल्याचा अभिमान एकत्र अनुभवू शकलो. मेस्सीने आपल्या संदेशात स्पेनचेही अभिनंदन केले, तो म्हणाला, या विजेतेपदाबद्दल मी स्पेनचे मनःपूर्वक अभिनंदन करू इच्छितो.

इंटर मियामीचा स्टार फुटबॉलपटू मेस्सीने २०२२ च्या विश्वचषक अंतिम सामन्यात फ्रान्सला हरवून अर्जेंटिनाला विश्वविजेतेपद मिळवून दिले. त्याने २०२१ आणि २०२४ मध्ये संघाला सलग दोन कोपा अमेरिका विजेतेपदेही मिळवून दिली. या विश्वचषकादरम्यान, मेस्सीने आपल्या आंतरराष्ट्रीय गोलची संख्या १२५ वर पोहोचवली, जो केवळ ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (१४६ गोल) मागे आहे.

२०२६ च्या विश्वचषकात मेस्सीने आठ गोल आणि चार असिस्ट केले. तो विश्वचषकाच्या इतिहासात तीन अंतिम सामन्यांमध्ये सुरुवातीपासून खेळणारा पहिला फुटबॉलपटू ठरला, जरी यावेळी तो स्पेनविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. दरम्यान, अर्जेंटाइन फुटबॉल असोसिएशनचे (एएफए) अध्यक्ष क्लॉडिओ तापिया यांनीही राष्ट्रीय संघासाठी दिलेल्या त्याच्या असाधारण सेवा आणि योगदानाची प्रशंसा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande