
सिन्नर, 21 जुलै, (हिं.स.) : नाशिक-पुणे महामार्गावरील गुरेवाडी फाटा येथील एमएनजीएल कंपनीच्या सीएनजी पंपावर सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सीएनजी कॅस्केड वाहनात गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक गॅस गळती झाल्याने परिसरात खळबळ उडाली, या घटनेत विशाल संजय वारुंगसे (वय १९, रा. डुबेरे) हा कर्मचारी जखमी झाला असून त्याचा पाय फ्रैक्चर झाला आहे. त्याच्यावर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरेवाडी फाटा येथील एमएनजीएल कंपनीच्या ऑनलाइन सीएनजी पंपावरून कॅस्केड वाहनांद्वारे विविध ऑफलाइन पंपांना गॅसचा पुरवठा केला जातो. सोमवारी रात्री कैस्केड वाहनातील टाक्यांमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक नोझलमधून गॅसची गळती सुरू झाली. त्यावेळी मोठा आवाज आल्याने पंप परिसरात घबराट पसरली. गॅस भरत असलेला कर्मचारी विशाल वारुंगसे हा गंभीर जखमी झाला.
गॅस गळतीचा आवाज होताच पंपावरील वाहनचालकांनी तातडीने तेथून धाव घेतली. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत इमर्जन्सी बटण कार्यान्वित करून गॅसचा पुरवठा बंद केला. तरीही कॅस्केड वाहनातील सुमारे एक हजार किलो गॅस पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत परिसरात भीतीचे वातावरण कायम होते. सीएनजी पंपालगतच इंधन पंप असून परिसरात दाट वस्ती आहे. त्यामुळे गॅस गळतीची माहिती मिळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गळती पूर्णपणे थांबल्यानंतरच परिसरातील व्यवहार पूर्ववत सुरू झाले. घटनास्थळी एमएनजीएल कंपनीचे अधिकारी व सुरक्षा रक्षक तैनात होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिकरक्षक नागरिकांनी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधून अग्निशमन बंब तैनात केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV