एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; हरमनप्रीत सिंग कर्णधार
नवी दिल्ली, २१ जुलै, (हिं.स.). हॉकी इंडियाने बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे २०२६ मध्ये होणाऱ्या एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषकासाठी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. अनुभवी बचावपटू आणि ड्रॅग-फ्लिक विशेषज्ञ हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी सो
हरमनप्रीत सिंग


नवी दिल्ली, २१ जुलै, (हिं.स.). हॉकी इंडियाने बेल्जियम आणि नेदरलँड्स येथे २०२६ मध्ये होणाऱ्या एफआयएच हॉकी पुरुष विश्वचषकासाठी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. अनुभवी बचावपटू आणि ड्रॅग-फ्लिक विशेषज्ञ हरमनप्रीत सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर अनुभवी मिडफिल्डर मनप्रीत सिंग यांच्यामुळे संघाला महत्त्वपूर्ण अनुभव मिळेल.

हा विश्वचषक १५ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये आयोजित केला जाईल. भारताला इंग्लंड, पाकिस्तान आणि वेल्ससोबत 'पूल डी' मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघ आपले सर्व लीग सामने नेदरलँड्समधील ऍमस्टेलवीन येथे खेळेल.

मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी संघ निवडीबद्दल समाधान व्यक्त केले आणि म्हणाले, हा एक संतुलित संघ आहे. यात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेले तरुण खेळाडू आणि मोठ्या स्पर्धांचा अनुभव असलेल्या खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे. या तरुण खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीच्या जोरावर संघात आपले स्थान मिळवले आहे, त्यांच्या प्रतिष्ठेच्या जोरावर नाही.

भारत आपल्या मोहिमेची सुरुवात १५ ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्ध करेल. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी त्यांचा सामना इंग्लंडशी आणि १९ ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल. भारत-पाकिस्तान सामना हा साखळी फेरीतील सर्वात बहुप्रतिक्षित सामना मानला जातो.

फल्टन म्हणाले, 'दबाव, प्रतिहल्ला आणि अंमलबजावणी' ही केवळ आमची रणनीती नाही, तर ती या संघाच्या विचारांचा आणि प्रशिक्षणाचा पाया आहे. आम्ही सध्या फार दूरचा विचार करत नाही आहोत. एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करणे आणि प्रत्येक सामन्यात आमचे सर्वोत्तम देणे हे आमचे ध्येय आहे.

ते पुढे म्हणाले, भारताने १९७५ मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्या ऐतिहासिक कामगिरीनंतर पन्नास वर्षांनी, या संघाला भारतीय हॉकीच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिण्याची संधी मिळाली आहे आणि आम्ही सर्वजण त्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत.

भारतीय हॉकी संघ:

गोलकीपर: मोहित एचएस, सूरज करकेरा

डिफेंडर: जर्मनप्रीत सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित, यशदीप सिवाच

मिडफिल्डर: मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलकांत शर्मा, राजिंदर सिंग, आदित्य अर्जुन लालगे

फॉरवर्डः मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande