औंढा नागनाथ मंदिर विकासकामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.) : हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील श्री नागेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंद
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.) : हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील श्री नागेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील अत्यावश्यक कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

पाहणीप्रसंगी पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, जतन सहायक राम निपाणे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे, कंत्राटदार राहुल चव्हाण तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी मंदिराच्या मूळ स्थापत्य रचनेचे जतन करत दुरुस्तीची कामे करण्यावर विशेष भर दिला. मंदिराची तटबंदी, भिंतींची दुरुस्ती, परिसरातील 22 ठिकाणची रंगरंगोटी काढणे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या शिखर व छतावरील गळती रोखण्यासाठी उपाययोजना तसेच मुख्य रासायनिक संवर्धनाची कामे तातडीने आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विकासकामांची गुणवत्ता, कामाची गती आणि नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. भाविकांना अधिक सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंजूर आराखड्यानुसार व निर्धारित मुदतीत कामे पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.

विकास आराखड्याला मान्यता

बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने व्यापक विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यांतर्गत मंदिर परिसराचे संवर्धन, सुशोभीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणारी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

मुंबई येथे 23 जून रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत 182.83 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.

याशिवाय 25 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीत दुसऱ्या टप्प्यातील 266.61 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती.

संवर्धन व परिसर विकासासाठी स्वतंत्र आराखडे

उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार पुरातत्त्व विभागाने 76.55 कोटी रुपयांचा सुधारित संवर्धन आराखडा, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य परिसर विकासासाठी 106.28 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे. या प्रकल्पांची अंमलबजावणी निश्चित यंत्रणांमार्फत प्रभावीपणे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या सर्व कामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पाहणी केली. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी या प्रकल्पांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande