शेतीला मत्स्यपालनाची जोड; रायगडात 861 शेततळ्यांवर प्रात्यक्षिके
रायगड, 21 जुलै, (हिं.स.)। : हवामान बदल, अनियमित पाऊस आणि शेतीतील वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात मोठा उपक्रम राबविण्यात ये
Linking fish farming to agriculture; Demonstrations on 861 farm ponds in Raigad


रायगड, 21 जुलै, (हिं.स.)। : हवामान बदल, अनियमित पाऊस आणि शेतीतील वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात मोठा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 861 शेतकऱ्यांच्या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन प्रात्यक्षिके राबविली जाणार असून, एकात्मिक शेतीला चालना मिळणार आहे.

योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला रोहू, कटला आणि मृगळ या जातींचे एक हजार मत्स्यबीज तसेच 60 किलो मत्स्यखाद्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. मत्स्यबीज संगोपन, खाद्य व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता, रोग नियंत्रण आणि आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञांकडून प्रशिक्षणही दिले जाणार आहे. मत्स्यबीज व खाद्याचा पुरवठा पुण्यातील मल्हार फिश इंटरप्रायझेस आणि वीर फिश सीड हॅचरी यांच्या माध्यमातून होणार आहे.

या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 300 शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन सुरू करण्यात येणार असून, यासाठी 1,722 मत्स्यबीज हंड्यांचा पुरवठा केला जाणार आहे. तालुकानिहाय उरणमध्ये सर्वाधिक 300, कर्जत व रोहामध्ये प्रत्येकी 100, तर पनवेल, पेण, सुधागड व माणगाव येथे प्रत्येकी 50 शेततळ्यांचा समावेश आहे. अलिबाग, खालापूर, महाड, मुरूड, तळा, पोलादपूर आणि श्रीवर्धन या तालुक्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे.

कृषी विभागाच्या मते, शेततळ्यांचा वर्षभर प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पूरक उत्पन्नाचा स्थिर स्रोत उपलब्ध होईल. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, जलसंधारणाचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande