बीड मतदारसंघातील ग्रामीण विकासकामांना गती
बीड, 21 जुलै, (हिं.स.)। बीड मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकासकामे, नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड पंचायत समितीतील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आ
संदिप क्षीरसागर


बीड, 21 जुलै, (हिं.स.)। बीड मतदारसंघातील ग्रामीण भागातील विकासकामे, नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड पंचायत समितीतील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

बैठकीत ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कृषी, जलसंधारण तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यावर भर देण्यात आला. विकासकामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करून प्रलंबित प्रस्तावांना गती द्यावी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार संदीप क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande