
सोलापूर, 21 जुलै (हिं.स.)सोलापूर महानगरपालिकेच्या सन २०२५-२६ मधील नालेसफाई कामांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने त्रिसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. सर्वसाधारण सभेत या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर आणि कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
ही समिती नालेसफाई कामांतील कथित अनियमितता, प्रत्यक्ष कामांची गुणवत्ता, झालेला खर्च, तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी यांची सर्वंकष चौकशी करणार आहे. चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.दरम्यान, या प्रकरणात नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्या भूमिकेबाबतही सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय महापालिका आयुक्तांकडून घेतला जाणार असल्याने या प्रकरणातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड