
लातूर, 21 जुलै (हिं.स.) : स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उदगीर येथे ‘जनसेवा सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले असून, या अंतर्गत आरोग्य, सामाजिक, महिला सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत.माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी नागरिकांनी या उपक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
जनसेवा सप्ताहाची सुरुवात दि. 22 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आयोजित भव्य रक्तदान शिबिराने होणार आहे. दि. 23 जुलै रोजी हुतात्मा स्मारक, उदगीर येथे वृक्षारोपण तसेच हत्तीबेट येथे ‘देवगिरी ते देवराई’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.
दि. 24 जुलै रोजी सामाजिक उपक्रमांतर्गत उदगीर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता आणि उदगीर किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
दि. 25 जुलै रोजी मुसा नगर, उदगीर येथे अल्पसंख्याक समाजासाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर, आधारकार्ड दुरुस्ती आणि आयुष्मान कार्ड नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दि. 26 जुलै रोजी विद्यावर्धिनी विद्यालय, उदगीर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजारांची तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने दि. 27 जुलै रोजी पंचायत समिती, उदगीर येथे महिला बचत गट मेळावा, कर्जवाटप आणि महिला शेतकरी सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच दि. 28 जुलै रोजी कृषी विषयक उपक्रमांतर्गत आदर्श शेतकरी सन्मान पुरस्कार वितरण आणि शेती मार्गदर्शन शिबिर होणार आहे.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचणे ही काळाची गरज असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अशा शिबिरांमुळे मोठा आधार मिळतो, असे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले.
‘जनसेवा सप्ताह’ हा समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा उपक्रम असून, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक हितासाठी लोकाभिमुख कार्यक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीर तालुका व शहरचे पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis