
लातूर, 21 जुलै (हिं.स.) :विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी ता. जि. लातूर येथे आगामी गळीत हंगाम 2026-27 वेळेवर आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व तयारी वेगाने सुरू आहे. या तयारीचा एक भाग म्हणून मंगळवार, दि. 21 जुलै 2026 रोजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मिल रोलर पूजनानंतर संचालकांच्या उपस्थितीत गळीत हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे वेळेत गाळप होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व हंगामपूर्व यंत्रसामुग्री देखभाल व दुरुस्तीची कामे प्रगतिपथावर आहेत.
ऊस तोडणीचे यांत्रिकीकरणावर भर
आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध असून, सभासदांच्या 14,719.78 हेक्टर आणि बिगर सभासदांच्या 6,113.09 हेक्टर अशा एकूण 21,032.87 हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंद झाली आहे.
यंदाच्या हंगामात जास्तीत जास्त ऊस तोडणी यंत्राद्वारे करण्याचे नियोजन कारखान्याने केले आहे. भविष्यातील ऊस उपलब्धता लक्षात घेऊन 100 टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे करण्याच्या दृष्टीने आवश्यक मशिनरी बसविण्यात येत आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे कारखाना बंद राहण्याचे तास कमीत कमी राहतील, याची दक्षता घेतली जाणार आहे.
कारखान्याची मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू असून, लवकरच कारखाना गळीत हंगामासाठी पूर्णपणे सज्ज होईल, अशी माहिती कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
विक्रमी ऊसदरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखाना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख आणि चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करत आहे.
मागील गळीत हंगामात कारखान्याने ऊस उत्पादकांना प्रति मेट्रिक टन 3,171 रुपये इतका उच्चांकी दर दिला होता. या विक्रमी दरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या आर्थिक स्थितीला मोठी मदत झाली आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार तथा व्हा. चेअरमन वैजनाथराव शिंदे, कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, संचालक रवींद्र काळे, अमृत जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, गोवर्धन मोरे, रंजीत पाटील, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, दीपक बनसोडे, सौ. लताबाई देशमुख, सुभाष माने, ऊस उत्पादक सभासद रमेश देशमुख तसेच खातेप्रमुख, विभाग प्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis